यावल तालुक्यात 40 हजार 300 लाभार्थींना ‘आनंदाचा शिधा’


यावल : यावल तालुक्यात राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेला आनंदाचा शिधा वाटपास सुरवात झाली आहे. गुढीपाडवा ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हा उपक्रम हाती घेण्यात आला असून यावल तालुक्यात या 100 रुपयात दिल्या जाणार्‍या आनंदाचा शिधा चा लाभ 40 हजार 300 लाभार्थ्यांना दिला जात आहे व वितरण सुरू झाले आहे. यावल येथील तहसीलदार महेश पवार, पुरवठा निरीक्षक अंकिता वाघमळे, पुरवठा विभागाचे वाय.डी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यावल तालुक्यातील 122 रास्त धान्य दुकानांमध्ये आनंदाचा शिधा वितरणाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला. गुढीपाडव्यापासून या उपक्रमाला सुरुवात झाली होती मात्र, त्यावेळी अल्प प्रमाणावर नियतन प्राप्त झाल्याने वितरणास अडचणी आल्या मात्र आता शंभर टक्के नियतन प्राप्त झाले असून यावल तालुक्यातील 40 हजार 300 कार्डधारकांना हा आनंदाचा शिधा दिला जाणार आहे.

शंभर टक्के वितरण होणार
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत सदर वितरण यावल तालुक्यात 100 टक्के पूर्ण केले जाणार आहे. यासाठी सर्व दुकानदारांच्या वतीने परीश्रम घेतले जात आहे. या आनंदाचा शिधा वितरणाचा उपक्रम यावल शहरात देखील घेण्यात आला व रास्त धान्य दुकानदारांच्या वतीने आनंदाचा शिधा हा वितरण करण्यात आला. आता तालुक्यातील ग्रामीण भागात व शहरी भागात वितरण केले जात आहे

आनंदाचा शिधा असा
राज्य सरकारकडून गुढीपाडवा ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शंभर रुपयात आनंदाचा शिधा वाटपाचा निर्णय घेण्यात आला होता. यामध्ये शंभर रुपयात एक किलो रवा, एक किलो साखर, एक लिटर पामतेल आणि एक किलो चना डाळ एकाच पिशवीत पॅक करून लाभार्थ्यांना दिला जात आहे. यावल तालुक्यातील यावल तालुक्यात अंत्योदय लाभार्थी कार्डधारक 10 हजार 433 आहेत तर प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी कार्डधारक 29 हजार 867 असे आहेत असे एकूण 40 हजार 300 लाभार्थींना हा आनंदाचा शिधा वितरण केला जात आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !