चार हजारांची लाच भोवली : खिरोदा तलाठ्यासह कोतवाल जळगाव एसीबीच्या जाळ्यात
4 thousand bribe : Khiroda Talathi in Jalgaon ACB’s net भुसावळ : सातबारा उतार्यावर नाव लावण्यासाठी चार हजारांची लाच मागून ती स्वीकारताना रावेर तालुक्यातील खिरोदा गावातील तलाठ्यासह कोतवालाला जळगाव एसीबीने गुरुवारी दुपारी कार्यालयातच रंगेहाथ अटक केल्याने महसूल यंत्रणेतील लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे. तलाठी प्रमोद प्रल्हाद न्हायदे (45, रा.गणेश कॉलनी, फैजपूर) व कोतवाल शांताराम यादव कोळी (52, रा.खिरोदा, ता.यावल) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
कार्यालयात सापळा यशस्वी
खिरोदा गावातील 63 वर्षीय तक्रारदार यांचे भाऊ मयत झाले असून त्यांची वडिलोपार्जीत शेती खिरोदा तलाठी कार्यालयाचे हद्दीत आहे. मयत भावाच्या पत्नीसह मुलाचे नाव वारस म्हणून सातबारा उतार्यावर लावण्यासाठी तक्रारदाराकडे तलाठी न्हायदे यांनी गुरुवारी चार हजारांची लाच मागितल्याने एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली. गुरुवारी दुपारी तीन वाजता खिरोदा तलाठी कार्यालयात तलाठ्यासह कोतवालाने लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली. दोन्ही आरोपीतांविरुद्ध सावदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

हा सापळा जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात निरीक्षक
एस.के.बच्छाव, नाईक ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल राकेश दुसाने, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, नाईक जनार्दन चौधरी, नाईक बाळू मराठे, प्रदीप पोळ, अमोल सूर्यवंशी, प्रणेश ठाकुर आदींच्या पथकाने यशस्वी केला.