चार हजारांचे लाच प्रकरण : खिरोदा तलाठ्यासह कोतवालाची कारागृहात रवानगी
Four thousand bribe case : Kotwal sent to jail along with Khiroda Talathi भुसावळ : सातबारा उतार्यावर नाव लावण्यासाठी चार हजारांची लाच मागून ती स्वीकारताना रावेर तालुक्यातील खिरोदा गावातील तलाठी प्रमोद प्रल्हाद न्हायदे (45, रा.गणेश कॉलनी, फैजपूर) व कोतवाल शांताराम यादव कोळी (52, रा.खिरोदा, ता.यावल) यांना जळगाव एसीबीने अटक केली होती. संशयीतांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
चार हजारांची लाच भोवली
खिरोदा गावातील 63 वर्षीय तक्रारदार यांचे भाऊ मयत झाले असून त्यांची वडिलोपार्जीत शेती खिरोदा तलाठी कार्यालयाचे हद्दीत आहे. मयत भावाच्या पत्नीसह मुलाचे नाव वारस म्हणून सातबारा उतार्यावर लावण्यासाठी तक्रारदाराकडे तलाठी न्हायदे यांनी गुरुवारी चार हजारांची लाच मागितल्यानंतर एसीबीने सापळा रचून त्यांना अटक केली होती. दोन्ही संशयीताना शुक्रवारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांची जळगाव कारागृहात रवानगी करण्यात आली. तपास एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात निरीक्षक एस.के.बच्छाव व सहकारी करीत आहेत.
