नाशिक जिल्ह्यात एस.टी.बसला भीषण अपघात : महिला वाहकासह दोघे ठार
Fatal accident to ST bus in Nashik district : Two killed including female conductor नाशिक : नांदुरीहून मनमाडकडे निघालेल्या बसला समोरील वाहनाने कट मारल्यानंतर त्याचवेळी भरधाव एसटी बसचा रॉड तुटल्याने ती झाडावर जावून आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात एस.टी.कंडक्टरसह एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर अन्य 20 हून अधिक प्रवासी जखमी झाले. हा अपघात शुक्रवार, 7 एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्यातील देवळा-मनमाड मार्गावर घडला. या अपघातात एस.टी.बसचा चक्काचूर झाला.
रॉड तुटल्याने अपघात
मनमाड आगाराची बस नांदुरीहून मनमाडकडे निघाल्यानंतर बसचा रॉड तुटल्याने रॉड तुटून बस झाडावर आदळली तर ही धडक इतकी जोरदार होती की बसचा पूर्णपणे चक्काचूर झाला. चांदवडजवळील मतेवाडीनजीक हा अपघात घडला तर बसमधील वाहक सारीका लहरे यांचा जागीच मृत्यू झाला तर एका प्रवाशाचा मृत्यू उपचारादरम्यान ओढवला. मृतांचा आकडा वाढण्याची भीती असून या बसमधील 20 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.

अनेक जखमींची प्रकृती गंभीर
अपघात एवढा भीषण होता की, बसच्या एका बाजूचा चक्काचूर झाला आहे. या भीषण अपघातात महिला बस कंडक्टरचा जागीच मृत्यू झाला. तर काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील काही जखमींची प्रकृती गंभीर आहे.