रावेर तालुक्यात युवकाचा खून : सहा संशयीत ताब्यात
Murder of youth in Raver taluka : Six suspects detained भुसावळ : रावेर तालुक्यातील सायबूपाडा-निमड्या रस्त्यावरील अली नाल्याजवळ
30 वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर रावेर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. संजय रेमसिंग पावरा (30, सायबूपाडा नवाड, ता.रावेर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पावरा यांचा खून कुणी व का केला? याची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही.

सहा संशयित ताब्यात
पोलिसांनी धाव घेत घटनास्थळाची पाहणी करीत घटनास्थळावरून मयताची दुचाकी, फुटलेला मोबाईल तसेच दोन दारूच्या रीकाम्या बाटल्या जप्त केल्या आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी रावेर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला असून अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर सहा संशयीतांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले आहे.
खून करून मृतदेह फेकला
सातपुड्यात असलेल्या व रावेरपासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर सायबूपाडा नवाड ही वस्ती असून या वस्तीपासून एक किलोमीटर अंतरावरील निमड्या रस्त्यावरील अली नाल्याजवळ संजय पावरा या तरुणाचा शनिवारी सकाळी मृतदेह आढळला. तरुणाच्या डोक्यावर तसेच तोंडावर दगडाने वार करण्यात आला असून खुनाचे कारण मात्र अस्पष्ट आहे. संजय शुक्रवारपासून बेपत्ता असल्याने त्याचे वडिल शोध घेत असताना अली नाल्याजवळ त्याचा मृतदेह आढळला.
पोलिस अधिकार्यांची धाव
खुनाची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे, रावेरचे पोलिस निरीक्षक कैलास नगरे, पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे यांनी धाव घेतली. घटनास्थळी डॉग स्कॉड व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आल्यानंतर पंचनाम्याअंती मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला. मयत तरुणाच्या खुनाचे कारण अस्पष्ट असून या प्रकरणी अज्ञाताविरोधात रावेर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक विशाल सोनवणे करीत आहेत.