भुसावळात लाखोंचा गुटखा जप्त : दोघांना अटक ; गुटखा माफियावर कारवाईची अपेक्षा

गायत्री पान सेंटरवरील कारवाईने खळबळ : शहरातील गुटखा माफियांचे काय ?


Gutkha worth lakhs seized in Bhusawal : Two arrested ; Expect action against gutkha mafia Gutkha worth lakhs seized in Bhusawal : Two arrested ; Expect action against gutkha mafia भुसावळ : शहरातील वसंत टॉकीज जवळील गायत्री पान सेंटरमधून राज्यात प्रतिबंधीत गुटखा जप्त करण्यात आल्याने गुटखा तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोन दुकाने व घरून सुध्दा सुमारे दोन लाखांचा गुटखा जप्त केला असून शहर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शहरातील एका पानटपरीवर कारवाई होते मात्र शहरातील इतर गुटखा माफियांचे काय? शहरात पानटपर्‍यांसह किराणा दुकानांवर विक्री होणार्‍या गुटख्यावर कारवाई करण्याचे धाडस पोलिस यंत्रणा दाखवणार का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

एलसीबीच्या कारवाईने खळबळ
शहरातील वसंत टॉकीजजवळ असलेल्या गायत्री पान सेंटरवर गुटखा विक्री होत असल्याची गुप्त माहिती एलसीबी पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाल्याने त्यांनी एलसीबी कर्मचार्‍यांचे पथक मिळालेल्या माहितीची खात्री करण्यासाठी पाठविले असता गायत्री पान सेंटरवर गुटखा, रजनीगंधा आदी पॅकेट मिळाले. जळगाव रोडवरील दुकानात सुध्दा पोलिसांना गुटखा मिळाला. पोलिसांनी सर्व गुटखा जप्त करून शहर पोलिस ठाण्यात आणला. तेथे जप्त केलेल्या गुटख्याची मोजणी होत होती. रात्री उशीरापर्यत ही प्रक्रीया सुरू होती. सुमारे दोन लाख रूपये किंमतीचा हा गुटखा असल्याची माहिती आहे.

यांच्या पथकाने केली कारवाई
या पथकात डीवायएसपी आप्पासो पवार, डीवायएसपी सतीश कुळकर्णी, उपनिरीक्षक गणेश वाघमारे तसेच सहायक फौजदार युनूस शेख, सुनील दामोदरे, दिपक पाटील, श्रीकृष्ण देशमुख, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, किशोर राठोड, रणजित जाधव, प्रमोद ठाकूर यांनी ही कारवाई केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून जप्त केलेला गुटख्याचा माल शहर पोलिस ठाण्यात आणला.

दोघे चौकशीकामी ताब्यात
एलसीबीच्या पथकाने कारवाई केल्यावर वसंत टॉकीज जवळ पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. तोपर्यत पोलिसांनी अन्य ठीकाणी तपासणी करीत गुटखा जप्त केला. पोलिसांनी प्रकाश व पियुष जोशीसह दोन जणांना चौकशीकामी ताब्यात घेतले. येथील शहर पोलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती, या प्रकारामुळे अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

शहरातील बड्या गुटखा माफियावर कारवाई का नाही ?
शहरात एक बडा गुटखा विक्रेता कार्यरत असून त्याच्यावर कारवाई का होत नाही ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. शहरातील अनेक पानटपर्‍या तसेच किराणा दुकानांमध्ये सर्रास गुटखा उपलब्ध होत असल्याने त्यांच्यावर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी आता या गुटख्याबाबत दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !