भुसावळ विभागातील 183 किमी अंतराच्या रेल्वे रूळांचे नूतनीकरण
भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात संपलेल्या आर्थिक वर्षात रेल्वे सिव्हिल इंजिनिअर विभागाने पायाभूत सुविधा आणि रेल्वे ट्रॅकच्या सुरक्षेसाठी 183 किलोमीटर ट्रॅकचे नूतनीकरण केले. मागील वर्षापेक्षा हे नूतनीकरण 20 टक्के जास्त करण्यात आले आहे. गतवर्षी 163 किलोमीटर ट्रॅकचे नूतनीकरण झाले होते. यंदा 110 किलोमीटर ट्रॅकचे डीप स्क्रीनिंग झाले. भुसावळ विभागात 24 लेव्हल क्रॉसिंग गेटस् काढण्यात आले. 32 अंडर ब्रिज रोड नव्याने बांधत कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे.
नवीन तंत्रज्ञानाने वाढला कामाचा वेग
विभागात जमिनीवरील अतिक्रमण काढण्याची मोहिम हाती घेण्यात आली त्याद्वारे 0318 हेक्टर क्षेत्रातून 184 अतिक्रमणे काढली. ट्रॅकचे रेल्वे फॅक्टर वेल्ड फेल्युअर्समध्ये घट झाली आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे मागील वर्षातील 49 घटनांच्या तुलनेत या आर्थिक वर्षात फक्त 24 घटना झाल्या. रेल्वे फॅक्चर, वेल्डिंग ऑफ ट्रॅक घटनांमध्ये 51 टक्के घट झाली. रेल्वेच्या सुरक्षेसाठी ट्रॅकची अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चाचणी घेण्यात येते. यावर्षी 949 किलोमीटर मार्गाची तपासणी करण्यात आली. विभागातील सध्याच्या 44 पुलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी पुर्नर्णीबांधणीचे काम पूर्ण झाले आहे. गेल्य वर्षात 22.20 कोटी रुपयांची कमाई केली. गेल्यावर्षी पेक्षा ती 175 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. गेल्या वर्षी इंजिनिअरिंग विभागाचा महसूल 12.69 कोटी होता. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 774.86 कोटी रुपये या वर्षात खर्च करण्यात आले. विभागाला वाट केलेल्या अनुदानाच्या शंभर टक्के रक्कम आहे.

डीआरएम एस.एस.केडिया यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ विभागीय अभियंता (समन्वयक) तरुण दंडोतिया यांच्य नेतृत्वाखाली रेल्वेच्या सिव्हिल इंजिनिअरींग विभागाने ही कामगिरी केली. रेल्वेत नवीन तंत्रज्ञान येत आहे. त्यामुळे कामाचा वेग वाढला आहे. पूर्वी रेल्वेचे रूळ टाकण्यासाठी अनेक दिवस लागायचे. आता नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कमी वेळेत हे काम होते. भुसावळ विभागात याच तंत्रज्ञानाच वापर विकासात्मक कामांच्या वेळी केला जात आहे.