भुसावळ शहरात पाणीपुरवठा ठप्प
पाईप लाईनच्या जोडणीमुळे उत्तर व दक्षिण भागात पाण्यासाठी हाल
भुसावळ : शहरात पालिकेने पाईन लाईन जोडणीचे काम हाती घेतल्यानंतर उत्तर व दक्षिण भागात पाणीपुरवठा ठप्प झाल्याने रणरणत्या उन्हाळ्यात नागरीकांश्रस महिलावर्गाला मंगळवारी पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली. शहरातील दक्षिण भागातील गडकरी नगर जलकुंभाला अमृत पाणीपुरवठा योजनेच्या पाईप लाईनवरुन स्वतंत्र पाईप लाईन जोडणीचे काम पालिकेने सोमवारपासून सुरू केले असलेतरी मंगळवारीदेखील काम पूर्ण झाले नसल्याने बुधवार दिवसभर काम चालणार आहे. परीणामी दक्षिण भागातील पाणीपुरवठा ठप्प झाला तर पाईप लाईन जोडणीत रीव्हर्स पाणी येत असल्याने उत्तर भागालाही पालिकेकडून पाणीपुरवठा होवू न शकल्याने नागरीकांचे चांगलेच हाल झाले.
तीन दिवस चालणार पाईपलाईनचे काम
पालिकेने गडकरी नगर जलकुंभाला स्वतंत्र जोडणीचे काम सोमवारपासून सुरू केले असलेतरी मंगळवारी अपेक्षित काम पूर्ण न झाल्याने बुधवारी दिवसभर काम करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या कामामुळे सोमवारनंतर दक्षिण भागात पाणीपुरवठा झालेला नाही शिवाय मंगळवारी उत्तर भागात पाणीपुरवठा होणार असलातरी पाईप लाईन जोडणीच्या ठिकाणी पाणी रीव्हर्स येत असल्याने कामाला अडथळा आल्याने उत्तर भागाचा पाणीपुरवठा थांबवण्यात आल्याचे पाणीपुरवठा अभियंता सतीश देशमुख म्हणाले. दोन्ही भागात गुरुवारी वा शुक्रवारी पाणीपुरवठा करण्याचे नियोजन असल्याचे ते म्हणाले.

नागरीकांची आता ट्यूबवेलवर मदार
उत्तर व दक्षिण भागातही पाणी न आल्याने रणरणत्या उन्हात महिलावर्गाला पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे. अनेक नागरीकांनी टँकरद्वारे सोय करून घेतली शिवाय अनेकांनी ट्यूबवेलवरून पाणी आणल्याचे चित्र शहरात होते. मंगळवारी केवळ दक्षिण भागातील सिंधी कॉलनी रीसरातील काही भागांना पाणीपुरवठा झाला असलातरी तो कमी दाबाचा असल्याच्या तक्रारी राहिल्या. दरम्यान, बुधवारी दिवसभरात पाईप लाईन जोडणीचे काम झाल्यानंतर गुरुवारी चाचणी घेवून खड्डा बुजवला जाईल तर उत्तर व दक्षिण भागाला गुरुवारी वा शुक्रवारी पाणीपुरवठा करता येईल, असे पाणीपुरवठा अभियंता देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, पाईप लाईन जोडणी कामामुळे बाजारपेठ पोलीस ठाण्यासमोरच वाहतुकीची कोंडी होत आहे.