काय सांगता ! सापळ्याचा संशय येताच फौजदाराने फेकली लाचेची रक्कम : पाठलागानंतर पकडताच सापडले 25 तोळे व अन लाख रोख


Police officer ran away after throwing away the bribe money, was chased and taken into custody; 9 lakhs cash, 25 tola gold seized जालना : लाचखोरांविरोधात एसीबीकडून अनेकदा विविध क्लुप्त्या वापरून सापळे यशस्वी केले जातात मात्र अनेकदा तक्रारदाराकडून होणार्‍या घाईमुळे अथवा अती उत्सुकतेमुळे आरोपीला संशय येतो व लाच घेण्यास तो नकार देतो त्यामुळे सापळा यशस्वी होत नाही मात्र जालन्यात अनोखा प्रकार घडला. लाचखोर फौजदाराला ट्रॅपची कुणकुण लागताच त्याने लाच स्वीकारताच लाचेची रक्कम रस्त्यात फेकली व कारने सुसाट प्रवास सुरू केला मात्र जिगरबाज एसीबी अधिकार्‍यांनी तीन किलोमीटर पाठलाग करीत फौजदाराला अटक केली. विशेष म्हणजे या फौजदाराच्या वाहनातून 9 लाख 41 हजार 590 रूपयांची रोकड आणि तब्बल 25 तोळे सोनं जप्त करण्यात आले. बुधवारी सकाळी जालना शहरात झालेल्या अनोख्या सापळ्यात राज्यात जोरदार चर्चा आहे. गणेश शेषराव शिंदे असे लाच घेणार्‍या फौजदाराचे नाव आहे.

लाचेचा संशय येताच ठोकली धूम
तक्रारदारास जालना शहरातील कदीम पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळाला आहे. या प्रकरणात कलम 110 ऐवजी 107 प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी व गुन्ह्यात मदत करण्यासाठी फौजदार गणेश शिंदे याने एक लाख रूपये लाचेची मागणी केल्याने तक्रारदाराने छत्रपती संभाजीनगर येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार पथकाने बुधवारी सकाळी जालना येथील कदीम पोलिस ठाण्याच्या आवारात सापळा लावला. फौजदार शिंदे याने लाचेची मागणी करून 75 हजार रूपये घेतले. परंतु, एसीबीच्या सापळ्याचा संशय आल्याने लाचेच्या रकमेसह शिंदे याने कारमधून पळ काढला.

तीन किलोमीटर पाठलाग
पथकाने सुमारे तीन किलोमीटर पाठलाग करून शिंदे याला ताब्यात घेतले.
यानंतर, त्याच्या कारची तपासणी केली असता घेतलेली लाचेची रक्कम वाटेत फेकून दिल्याचे समोर आले. पंचासमक्ष कारची तपासणी केली असता आतमध्ये 9 लाख 41 हजार 590 रूपयांची रोकड व तब्बल 25 तोळे सोने आढळून आले. संबंधित मुद्देमाल पथकाने जप्त केला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कदीम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलिस अधीक्षक विशाल खांबे, उपाधीक्षक मारूती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर व त्यांच्या सहकार्‍यांनी केली.

घराचीही झाडाझडती
फौजदार शिंदे राहत असलेल्या जालना शहरातील घराची लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून झाडाझडती करण्यात आली. त्या घरामध्ये काही सापडले नसल्याचे पथकाकडून सांगण्यात आले तर हिंगोली जिल्ह्यातील घराची झाडाझडती घेतली जात असल्याचे सांगण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !