अट्रावल दंगल : 14 संशयीतांना दोन दिवसांची पोलिस कोठडी
Atraval riots : 14 suspects remanded to two-day police custody यावल : तालुक्यातील अट्रावल येथे महापुरूषांच्या पुतळ्याची विटंबना होवून दंगल उसळली होती. या प्रकरणी चार विविध फिर्यादीवरून 205 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शासकिय कामात अडथळा निर्माण करीत बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणाच्या गुन्ह्यात 14 जणांना अटक करण्यात आली. त्यांना यावल न्यायालयात बुधवारी हजर केले असता शुक्रवारपर्यंत अर्थात दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
चार तक्रारीद्वारे 205 जणांविरोधात गुन्हा
अट्रावल गावात बारागाड्या ओढण्याच्या कार्यक्रमात बैलगाडीवर बसण्यावरून दोन गटातील तरुणांमध्ये वाद झाला व हा वाद उफाळत गावातील महापुरूषांच्या पुतळ्याची विटंबना होवून दंगल उसळली होती. जमावाच्या दगडफेकीत पोलीस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर यांच्यासह पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले. दंगलीनंतर पोलिसांकडून दोन व परस्पर विरूध्द दोन अशा चार फिर्यादी दाखल करीत 205 जणांविरोधात गुन्हे दाखल केले. यातील पोलीस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर यांच्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आलेल्या शासकिय कामात अडथळा व दगडफेकीच्या गुन्ह्यात 14 जणांना अटक करण्यात आली व या सर्वांना यावल न्यायालयात प्रथमवर्ग न्या.एम.एस.बनचरे यांच्या समोर हजर केले असता सर्वांना शुक्रवारपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर करीत आहे.
