भुसावळातून मोबाईल डिस्ट्रीब्युटरचे 50 हजारांचे मोबाईल लांबवले
50,000 mobiles of mobile distributor were extended from Bhusawal भुसावळ : जळगावातील मोबाईल डिस्ट्रीब्युटरने भुसावळातील दुकानदाराला चार मोबाईलचे पार्सल पाठवल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी हे पार्सलच लांंबवल्याची घटना शहरातील स्टेशन रोडवरील पॉवर टुल्स शॉपमध्ये घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
शेजारच्या दुकानातून पार्सल लांबवले
शंकर पहेलाजराय हासवाणी (57, सिंधी कॉलनी, जळगाव) यांच्या तक्रारीनुसार, जळगावात ते ओप्पो मोबाईल विक्रीचे डिस्ट्रीब्युटर असून त्यांचे दुकानही आहे. भुसावळातील स्टेशन रोडवरील राजा मोबाईल या दुकानदाराकडे त्यांनी 48 हजार 978 रुपये किंमतीचे चार ओप्पो कंपनीचे मोबाईल पाठवले होते मात्र गुरुवार, 9 मार्च रोजी दुकान बंद असल्याने कुरीयर कंपनीच्या माणसाने हे पार्सल या दुकानाच्या शेजारील पॉवर टुल्स शॉपमध्ये ठेवले. पॉवर टुल्समधील कामगार रविवारी साफसफाई करीत असताना अज्ञाताने संधी साधून दुकानाच्या काउंटरवरील मोबाईलचे पार्सल लांबवले. राजा मोबाईल दुकानाच्या संचालकाने दुसर्या दिवशी मोबाईल पार्सलबाबत विचारणा केल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. या प्रकरणी हासवाणी यांच्या तक्रारीवरून बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व बाजारपेठ पोलिसांनी दुकानाची पाहणी केली तसेच सीसीटीव्हीद्वारे चोरट्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक निलेश बाबूलाल चौधरी करीत आहेत.
