रेल्वे अपघातात मयत झालेला तरुण युपीतील रहिवासी


A young UP resident who died in a train accident जळगाव : आसोदा रेल्वे गेटजवळ धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. मयत तरुणाची ओळख पटली असून राजाभैय्या लालचंद्र रावत (20, रा.राजाखेडा, ता.मौरवा, जि.उन्नाव, उत्तरप्रदेश) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गुरूवारी दुपारी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मोबाईलवरून पटली ओळख
उत्तरप्रदेशातील राजाखेडा येथील राजाभैय्या रावत हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होता. कामानिमित्त तो पंढरपूर येथे गेल्यानंतर बुधवार, 3 मे रोजी सकाळी राजाभैय्या हा आपल्या गावाकडील मित्रांसोबत आपल्या गावी परतत होता मात्र रेल्वेत तो दरवाजावळ बसल्यानंतर आसोदा रेल्वेगेटजवळ धावत्या रेल्वेतून पडून तो गंभीर जखमी झाला. गंभीर अवस्थेत राजाभैय्याला तात्काळ काही तरुणांनी जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरु असतांना गुरुवारी सकाळी 9 वाजता त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्याजवळील मोबाईलमधील सीमकार्ड पोलीस कर्मचारी वासुदेव मराठे यांनी आपल्या मोबाईलमध्ये टाकले. त्यावर राजाभैय्या याच्या भावाचा फोन आल्यामुळे मयताची ओळख पटली. शुक्रवारी सकाळी जिल्हा शासकीय रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात येवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास वासुदेव मराठे हे करीत आहे.


कॉपी करू नका.