अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल पथकाच्या ताब्यातून पळवले : अमळनेर तालुक्यातील प्रकार
Tractors transporting illegal sand seized by revenue squad: Case in Amalner taluka अमळनेर : अवैध वाळूने भरलेले ट्रॅक्टर महसूल पथकाने जप्त करताच वाळू माफियांनी ते पथकाच्या तावडीने पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रविवारी मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तलाठ्याच्या ताब्यातून पळवले ट्रॅक्टर
अमळनेर तालुक्यातील भरवस गावाजवळ अवैधरीत्या वाळू वाहतूक होत असल्याने तलाठी विकास परदेशी यांनी रविवारी सकाळी साडेसहा वाजता भरवस ते एकलहरे दरम्यानच्या रस्त्यावरून वाळूने भरलेले ट्रॅक्टर जप्त केले होते. ट्रॅक्टर चालक गणेश मोतीलाल पाटील (सबगव्हाण, ता.अमळनेर) याला वाळूने भरलेले ट्रॅक्टर मारवड पोलीस ठाण्यात लावण्याचे सांगितले. त्यानुसार महसूल पथक सोबत असतांना ट्रॅक्टर चालकाने वाळूने भरलेले ट्रॅक्टर घेवून बाजूच्या शेतातून पळ काढला. या प्रकरणी तलाठी विकास परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालक गणेश पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार सचिन निकम करीत आहे.


