भरधाव वाहनाने बुलेटला उडवले : जामनेरचे दोघे युवक जागीच ठार
Bullet fired by a speeding vehicle : Two youths of Jamner were killed on the spot मुक्ताईनगर : अज्ञात भरधाव वाहनाने बुलेटला जबर धडक दिल्याने जामनेर तालुक्यातील कापूसवाडी गावातील दोघे युवक जागीच ठार झाले. हा अपघात मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव उड्डाण पुलाजवळ रविवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडला. अपघाताला कारणीभूत असलेला वाहन चालक अपघात घडताच वाहनासह पसार झाला. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अपघातात तरुणांचा जागीच मृत्यू
जामनेर तालुक्यातील कापूसवाडी गावातील पृथ्वीराज पदमसिंग चव्हाण (33) व सागर बाबूराव हामरे (25, कापूसवाडी, ता.जामनेर) हे दोघे तरुण बुलेट (एम.एच.19 सी.एस.6968) वरून जात असताना रविवारी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव येथील उड्डाण पुलाजवळ अज्ञात वाहनाने बुलेटला जबर धडक दिल्याने दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच परीसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा
उपजिल्हा रुग्णालयात या दोन्ही तरुणांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून त्यांच्यावर सोमवारी सकाळी 11 वाजता कापूसवाडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या संदर्भात चरणसिंग सावजी चव्हाण (कापूसवाडी, ता.जामनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस स्थानकात अज्ञात वाहन चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक संदीप दुनगहू यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक विजय पढार करीत आहेत.


