अवैध वाळू ऐरणीवर : आव्हाणे गावात संतप्त जमावाने ट्रॅक्टर पेटवले
भरधाव ट्रॅक्टरने रीक्षाला धडक दिल्यानंतर जमाव संतप्त : तालुका पोलिसांची धाव
जळगाव : जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीने कहर केला असतानाच तालुक्यातील आव्हाने येथे वाळूच्या ट्रॅक्टरने लग्नातून परतणार्या वर्हाडींच्या रीक्षाला धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात चौघे जखमी झाल्याचे कळताच संतप्त जमावाने वाळू वाहतूक करणार्या दोन ट्रॅक्टर यांना आग लावल्याची घटना मंगळवारी दुपारी अडीच वाजता घडली. या घटनेने अवैध वाळू वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला असून आतातरी झोपलेले पोलीस व महसूल प्रशासन कारवाई करणार का? असा प्रश्न सुज्ञ जनता विचारत आहेत.
अपघातानंतर जमाव संतप्त
जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावाच्या नजीक असलेल्या गिरणा नदीतून बेसुमार अवैधरीत्या वाळूचा उपसा होत असून अवैधरीत्या वाळू चोरी होत असतानाही पोलीस व महसूल प्रशासनाने डोळेझाक केली आहे. मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास राहुल बारेला (मध्यप्रदेश, ह.मु.आव्हाणे) यांच्या मालकीचे दोन ट्रॅक्टर वाळू भरून गावातील बसस्थानक परीसरातून जात असताना विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरने जळगाव शहरातून आव्हाणे गावात येत असलेली प्रवाशी रीक्षा (एम.एच.19-1413) हिला जोरदार धडक दिली. या धडकेत रीक्षातील चालकासह तीन प्रवासी महिला गंभीर जखमी झाले. जखमी झालेले लोक आव्हाणे गावातीलच रहिवासी असून ते एरंडोल येथील लग्नाहून परतताना हा अपघात घडल्याचे समजते.
ही घटना घडल्यानंतर दोन्ही ट्रॅक्टर चालकांना जागेवर ट्रॅक्टर सोडून घटनास्थळाहून पळ काढला. अपघातानंतर आव्हाणे गावातील संतप्त ग्रामस्थांनी उभे असलेले दोन्ही ट्रॅक्टर पेटवून दिले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार व पोलीस कर्मचार्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले तसेच काहीच वेळात अग्निशमन दलाचा बंब दाखल झाला. या प्रकरणी जखमी झालेल्या महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.


