चाळीसगाव तालुक्यात बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश
चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील बोढरे शिवारात होणारा बालविवाह ग्रामसेवकांसह पोलिसांच्या सतर्कतेमुळे मंगळवारी रोखण्यात यश आले. तालुक्यातील बोढरे शिवारातील एकाच्या शेतात एका अल्पवयीन मुला-मुलींचा बालविवाह होत असल्याची गुप्त माहिती चाळीसगाव ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सतीश बंडगर यांच्या मदतीने विवाह रोखला.
यांचे लाभले सहकार्य
पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लोकेश पवार व ग्रामसेवकांनी हि कारवाई केली. त्याचबरोबर ग्रामसेवक सतीश बंडगर यांनी संबंधितांना नोटीस बजावली आहे तसेच हा विवाह रोखण्यात बोढरे येथील सामाजिक कार्यकर्ते गुलाब राठोड यांचाही मोलाचे योगदान लाभले.


