जमिनीत खड्डा खोदून दिड लाखांचे साहित्य लांबवणारे त्रिकूट जाळ्यात
जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई : मुद्देमाल जप्त
जळगाव : एमआयडीसीतील एच.डी.प्रोटेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये संरक्षक भिंतीच्या खाली खड्डा खोदून प्रवेश करून दीड लाख रुपयांचे साहित्य चोरून नेणार्या तीन संशयित आरोपींना एमआयडीसी पोलीसांनी मंगळवारी अटक केली आहे. देवानंद उर्फ देवा गोकूळ कोळी (32, कुसुंबा), विक्की आत्माराम कोळी (32, सावदा ता.रावेर, ह.मु.रामेश्वर कॉलनी, जळगाव) व ईश्वर श्रावण महाजन (34, रामेश्वर कॉलनी, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगावच्या एच.डी.प्रोटेक्ट कंपनीतून एक लाख 32 हजार 300 रुपये किंमतीचे मिडल एल्बो कास्टींग आणि 13 हजार रूपये किंमतीचे एनगॉट ब्राँझ धातूच्या दोन पट्टया चोरी झाल्याची घटना बुधवार, 3 मे रोजी सकाळी उघडकीला आली होती. याप्रकरणी कंपनीचे वरीष्ठ व्यवस्थापक मोहन बलवंत कुळकर्णी यांनी गुरूवारी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली होती. कंपनीत कंत्राटी पध्दतीने काम करणारा देवानंद उर्फ देवा गोकूळ कोळी (32) याच्यासह साथीदार विक्की आत्माराम कोळी व ईश्वर श्रावण महाजन यांनी चोरी केल्याचे पथकाल कळताच त्यांना अटक रकण्यात आली.
यांनी केली कारवाई
एमआयडीसी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, छगन तायडे, किरण पाटील, इम्रान सैय्यद, सचिन पाटील, साईनाथ मुंडे, ललित नारखेडे आदींच्या पथकाने केली. संशयित आरोपींना न्या.जे.एस.केळकर यांच्या न्यायासनापुढे हजर केले असता तिघांना 12 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.


