चाळीसगावात चाकूच्या धाकावर मोबाईल चोरी : पसार होताना चोरटा गंभीर जखमी


Mobile phone theft at knifepoint in Chalisgaon : Thief seriously injured while fleeing चाळीसगाव : घर उघडे असल्याची संधी साधून चोरट्याने प्रवेश करीत मोबाईल लांबवला मात्र त्याचवेळी घर मालकाला जाग आल्याने त्यांनी चोरट्याला रोखताच चोरट्याने चाकुचा धाक दाखवत पळ काढला. घर मालकाने यावेळी चोर-चोर आरडाओरड करताच नागरीक जमा झाल्यानंतर चोरट्यामागे धावताच चोरटा बांधकाम सुरू असलेल्या घराच्या दुसर्‍या मजल्यावर चढण्याच्या प्रयत्नात तोल जावून पडल्याने हाता-पायांना जबर मार बसला. पोलिसांनी या प्रकारानंतर धाव घेत जखमी चोरट्यास उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शंकर शिवाजी पवार (36, गुजरखेडा, ता.येवला, जि.नाशिक) असे जखमी चोरट्याचे नाव आहे.

पहाटे घरात प्रवेश करीत मोबाईल चोरीचा प्रयत्न
शहरातील कुल्फी व्यावसायीक अजय प्रेमसिंग राजपूत हे कुटुंबासह शाहू नगर, आरके लॉन्सजवळ वास्तव्यास आहेत. शनिवार, 13 रोजी पहाटे दीड वाजेच्या सुमारास कारखान्यातून घरी आल्यानंतर त्यांनी मुख्य दरवाजा उघडा ठेवून सोप्यावर अंग टाकले. पहाटे दोन वाजेच्या सुमारास हॉलमध्ये कुणीतरी आल्याचा आवाज आल्याने राजपूत यांनी पाहिले असता अंडरपॅन्टवरील संशयित घरात येवून टेबलावर ठेवलेला मोबाईल चोरताना दिसताच राजपूत यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता चोरट्याने कमरेला लावलेला चाकू काढून धाक दाखवत मोबाईल घेऊन पळ काढला.

उंचावरून पडताच चोरटा जखमी
त्याचवेळी राजपूत यांनी चोर चोर असा आवाज दिल्याने आजु-बाजुचे रहिवासी जागे झाले व त्यांनी पाठलाग केल्याने पाचशे मीटर अंतरावर दुसर्‍या गल्लीतील एका बांधकाम सुरू असलेल्या दोन मजली घरात चोर पळतांना दिसला व त्याचवेळी चोरटा दुसर्‍या मजल्याच्या स्लॅपवरून 8 ते 10 फुट खाली त्याच मजल्याच्या लादीवर पडताच त्याच्या चेहर्‍यावर व शरीरावर जखमा झाल्या. यावेळी पोलिसांनी त्यास ताब्यात घेत औषधोपचाराकामी तत्काळ ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. 13 हजार रुपये किंमतीचा रेडमी कंपनीचा मोबाईल जबरीने चोरी केल्याप्रकरणी अजय प्रेमसिंग राजपूत यांनी दिलेल्या तक्रारीवरून चोरटा शंकर शिवाजी पवार याच्याविरूद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !