मित्रांसोबत पोहायला गेला मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने धरणात बुडाला : चिंचोली गावात पसरली शोककळा
A child in Chincholi drowned while swimming in a dam जळगाव : धरणातील पाण्याचा अंदाज न आल्याने पोहत असताना 11 वर्षीच चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना धानवड गावाजवळील धरणात सोमवारी दुपारी चार वाजता घडली. करण जयराम पवार (11, चिंचोली, ता.जळगाव) असे मृत बालकाचे नाव आहे.
पाण्याचा अंदाज न आल्याने मृत्यू
करण पवार हा जळगाव तालुक्यातील चिंचोली गावात आई, वडील, भाऊ व दोन बहिणींसोबत वास्तव्याला होता. वडील जयराम सुकराम पवार हे ट्रॅक्टर चालक आहे तर आई सुनिता शेतात जावून आपला उदरनिर्वाह करतात. सोमवारी सकाळी आई व वडील हे शेतात कामासाठी निघून गेल्याने चारही भावंडे घरीच होते. दुपारी चार वाजेच्या सुमारास करण हा गावातील मित्रांसोबत जवळ असलेल्या धानवड गावानजीच्या धरणात पोहण्यासाठी गेला असता पाण्याचा कोणताही अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला.
एमआयडीसी पोलिसात नोंद
सोबतच्या तिघा मित्रांनी ग्रामस्थांना ही माहिती दिल्यानंतर पोहणार्या तरूणांनी पाण्यात उडी घेवून करणचा मृतदेह बाहेर काढला. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. एमआयडीसी पोलिसांनी पंचनामा केला. चिमुकल्याच्या मृत्यूने चिंचोली गावात हळहळ व्यक्त करण्यात आली. मयताच्या पश्चात आई सुनीता, वडील जयराम सुकराम पवार, मोठा भाऊ आकाश, तसचे कविता आणि दुर्गा या दोन बहिणी असा परीवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


