ट्रॅक्टरच्या धडकेने फुफणीच्या इसमाचा मृत्यू : तिघे जखमी
Phufani’s Isma dies after being hit by a tractor : Three injured जळगाव : दुचाकीवरून चौघे लग्नाला येत असताना भरधाव ट्रॅक्टरने धडक दिल्याने फुपणीतील 40 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला होता तर तिघे जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी 12:40 वाजता जळगाव तालुक्यातील किनोद गावाच्या पुढे सावखेडा फाट्यावर घडली होती. अपघात प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ज्ञानेश्वर रामराव सपकाळे (41) असे मयताचे नाव आहे.
अपघातात तिघे गंभीर
सपकाळे हे आपल्या दुचाकीने जळगाव शहरातील रिंगरोडवरील एका सभागृहात आयोजित नातेवाईकांच्या लग्नासाठी मोठा मुलगा डिगंबर सपकाळे (12), त्यांचे मित्र राजेंद्र सोनवणे (42), नीलेश निकम (38) यांच्यासह फुफणी येथून निघाल्यानंतर किनोद गावाच्या पुढे सावखेडा फाट्यावर सावखेड्याकडून येणार्या एका ट्रॅक्टरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने चारही जण दूर फेकले गेले. ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या डोक्याला व हाताला जबर मार लागल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला तर इतर तीन जण जखमी झाले. सावखेडा, किनोद ग्रामस्थांनी जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले.
पत्नी लग्नाच्या ठिकाणी पतीच्या प्रतीक्षेत
ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या जवळच्या नातेवाईकाकडे लग्न असल्याने, ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या पत्नी वंदना सपकाळे या सकाळीच लग्नाच्या ठिकाणी पोहोचल्या होत्या. त्याठिकाणी पोहोचल्यानंतर पतीसोबत येणार्या मुलाचीही त्या वाट पाहत होत्या मात्र लग्नाची वेळ झाल्यावर देखील पती व मुलगा आला नसल्याने वंदना सपकाळेंची धाकधूक वाढली. त्यानंतर काही वेळातच अपघाताची माहिती मिळाल्यानंतर लग्नाच्या ठिकाणी आनंदावर विरजण पडले. ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या पश्चात तीन मुलं, पत्नी, आई असा परीवार आहे. या प्रकरणी शांताराम शांताराम निकम (37, फुफणी) यांनी फिर्याद दिल्यावरून ट्रॅक्टर (एम.एच.19 ए.पी.7937) वरील अज्ञात चालकाविरोधात जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार अनिल फेगडे करीत आहेत.


