धरणगाव कृउबा निवडणुकीत संभ्रम भोवला : जळगाव जिल्हा बँक अध्यक्ष संजय पवार राष्ट्रवादीतून बडतर्फ


Confusion in Dharangaon Kriuba elections : Jalgaon District Bank President Sanjay Pawar dismissed from NCP जळगाव : धरणगाव कृउबा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या कुठल्याही पदावर नसताना बॅनर लावून पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण केल्याने जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बडतर्फ करण्यात आल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याबाबतचे आदेश पक्ष सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी काढले आहेत. संजय पवार यांनी धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी प्रणित सहकार पॅनलच्या वतीने निवडणूक लढत असल्याचे पोस्टर्स व बॅनर्स लावल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

सूचनेनंतरही नाही दखल
शिवाजीराव गर्जे यांच्या आदेश पत्रानुसार, ,धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत संजय पवार हे पक्षाच्या कोणत्याही पदावर नव्हते मात्र त्यांनी शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी प्रणित सहकार पॅनलच्या वतीने निवडणूक लढवित असल्याचे बॅनर्स व पोस्टर्स लावले. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संजय पवार गट अशा प्रकारचा उल्लेख करून पक्षाचे नाव, चिन्ह, नेत्यांचे फोटो लावून पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण केल्याची तक्रार पक्ष श्रेष्ठींकडे गेल्यानंतर बॅनर्स व पोस्टर्स तातडीने काढून टाकण्याचे आदेश 21 एप्रिल रोजी पत्रान्वये देवूनही दखल घेण्यात न आल्याने व पत्राबाबत खुलासा न दिल्याने तसेच राष्ट्रवादीत कुठलाही गट नसल्याने बडतर्फ करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद आहे.

तर कायदेशीर कारवाईचा इशारा
पक्ष विरोधी कृत्य करू नये अशा वारंवार सूचना देऊनही आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरुद्ध कारवाया करून पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यामध्ये गैरसमज पसरविण्याचे कृत्य केल्याचे निदर्शनास आल्याने मंगळवार, 16 मे पासून आपणास पक्षातून बडतर्फ केले जात असल्याचे गर्जे यांनी आदेशात नमूद केले आहे. यापुढे आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह, नेत्यांचे फोटो वापरू नयेत, तसे केल्यास आपल्यावर पुढील योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही संजय पवार यांना पाठवलेल्या पत्रान्वये देण्यात आला आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !