चाळीसगाव तालुक्यात उष्माघाताने दोघांचा बळी
Two victims of heat stroke in Chalisgaon taluka चाळीसगाव : उष्माघाताचा फटका बसल्याने चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारेसह दरेगावातील एकाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात तापमानाने गेल्या काही दिवसापासून उच्चांक गाठला आहे. चाळीसगाव तालुक्यातही उन्हाचे चटके असह्य झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. सकाळी 11 ते दुपारी 4 या दरम्यान आग ओकणार्या तापमानाने कहर केला आहे. उष्माघातामुळे दोन दिवसांपूर्वी तामसवाडी तरूण शेतकर्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच तालुक्यात दोघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
.
दरेगाव येथे शेतमजूराचा मृत्यू
दरेगाव येथील हरसिंग रायसिंग गायकवाड (60) या शेतमजूराचा शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अकस्मात मृत्यू झाला. त्यांना कुठलाही आजार नव्हता. ते घरापासून गावातील काही अंतरावरील एका दुकानापर्यंत गेले. तेथून घरी आल्यानंतर चक्कर येवून जमिनीवर कोसळताच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परीवार आहे.
धरणात मच्छीमारी करतांना मृत्युने गाठले
दुसर्या घटनेत इंदिरानगर, नवेगाव मेहूणबारे येथील राजेंद्र शिवाजी कोळी (45) हे शनिवार, 19 रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास सहकार्यांसह खडकीसीम धरणात काठावरील पाच ते सहा फुट पाण्यात चारचाकी वाहनाचे ट्युबवर बसून मासेमारीचे जाळे टाकून मासे पकडत होते मात्र रणरणतया उन्हातच धरणातील पाणी देखील वाफा फेकत असताना उष्माघाताचा फटका बसताच ट्युबवरून तेे पाण्यात पडले. त्यांच्या भावासह इतर साथीदारांनी त्यांना पाण्याबाहेर काढून तत्काळ खाजगी वाहनाने ग्रामीण रुग्णालय मेहुणबारे येेथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून मृत घोषीत केले. या प्रकरणी लक्ष्मण शिवाजी कोळी यांनी दिलेल्या खबरीवरून मेहुणबारे पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली.


