अमळनेर दंगलीतील संशयिताचा उपचारादरम्यान मृत्यू : आज शहर बंद

शहरात तणावपूर्व शांतता ; अफवांचे पीक ; पोलिसांकडून शांततेचे आवाहन


Suspect in Amalner Riots dies During Treatment : City Closed Today जळगाव : अमळनेर शहरात उसळलेल्या दंगलीप्रकरणी अटकेतील संशयित आरोपी तथा माजी नगरसेवक पूत्र अशपाक उर्फ पक्या सलीम शेख (33, दर्गाअली मोहल्ला, गांधी पुरा, अमळनेर) या तरुणाचा बुधवारी सायंकाळी सात वाजता जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू ओढवला. दरम्यान, दंगलीतील संशयिताचा मृत्यू झाल्याची वार्ता अमळनेरात धडकल्यानंतर व्यापारीपेठेत प्रचंड खळबळ उडून अवघ्या काही मिनिटात शहर कडकडीत बंद झाले तसेच दगडफेकीसह अन्य अफवांचे पीक जोरात पसरले मात्र पोलीस प्रशासनाने शहरात वाहने फिरवून नागरीकांना कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याचे सांगत शांतता राखण्याचे आवाहन केले. दरम्यान, अमळनेर शहरात शांतता अबाधीत राखण्यासाठी गुरुवारी दुपारी चार वाजेपर्यंत शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अशी आहे दंगलीची पार्श्वभूमी
शुक्रवार, 9 जून रोजी ओट्यावर बसलेल्या तरुणांमध्ये व्हिडिओ पाहण्याचा शाब्दीक वाद हाणामारीवर आल्यानंतर दोन समाजात तुफान दगडफेक होवून दंगल झाली तर दंगेखोरांनी सहाय्यक निरीक्षकालाच तलवार मारून जखमी केले तर काही लोटगाड्याही उलथवल्या. या प्रकरणी पोलिसांनी फिर्यादी होत 61 जणांवर जीवे ठार मारण्यासह दंगलीच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला. परीस्थिती चिघळू नये यासाठी दोन दिवस प्रांतांनी संचारबंदी लावली. दंगलीदरम्यान पोलिसांनी सुरूवातीला आधी 29 व नंतर दोन अशा 31 संशयितांना अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली.

प्रकृती खालावलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
पोलीस कोठडीत असलेल्या संशयित अशपाक सलीम शेख (33, दर्गाअली मोहल्ला, गांधी पुरा, अमळनेर) यास मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी असल्याने त्यादरम्यान त्याची प्रकृती खालावल्यानंतर पोलिसांनी त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले व बुधवारी त्याची न्यायालयीन कोठडी घेतली मात्र सायंकाळी सात वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. ही वार्ता अमळनेर शहरात पोहोचताच अफवांचे पीक पसरले. पाहता-पाहता अवघ्या काही मिनिटात दुकानदारांनी आपापली दुकाने बंद करीत घरचा रस्ता धरला तर नागरीकही मिळेल त्या साधनांनी घरोघरी पोहोचले.

पोलीस व लोकप्रतिनिधींचे शांतता राखण्याचे आवाहन
पोलीस प्रशासनाने शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याचे माईकद्वारे पोलीस वाहनातून जावून सांगितले तर अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील तसेच अमळनेर पत्रकार संघाचे चेतन राजपूत यांनी सोशल मिडीयातूनही नागरीकांना शांतता राखण्याचे व कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.

जिल्हा पोलीस अधीक्षकांची रुग्णालयात धाव
जिल्हा सामान्य रुग्णालयात अशपाक सलीम शेख (33, दर्गाअली मोहल्ला, गांधी पुरा, अमळनेर) या संशयिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर रात्री उशिरा मृतदेहाचे इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, जिल्हा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील आदींनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. यावेळी मुस्लीम समुदायासह नातेवाईकांची गर्दी झाल्याने पोलिसांनी मोठा बंदोबस्त यावेळी तैनात केला होता शिवाय अमळनेर शहरातील संवेदनशील भागासह अन्य भागातही मोठ्या प्रमाणावर अधिकची पोलीस कुमक तैनात करण्यात आली आहे. दरम्यान, मयत अशपाक हा शहरातील माजी नगरसेवक सलीम शेख यांचा मुलगा असून त्याच्यावर गुरुवारी अमळनेर येथे अंत्यसंस्कार (दफनविधी) करण्यात येणार आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !