भुसावळात उद्यापासून राज्यस्तरीय बॉक्सींग स्पर्धा : पाचशे खेळाडूंचा सहभाग
बाळा मोरे यांची पत्रकार परीषदेत माहिती : आजपासून तीन दिवस आयोजन
State level boxing tournament from tomorrow in Bhusawal : participation of 500 athletes भुसावळ : शहरातील रेल्वेच्या रंगभवनात छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्ता 35 वी ज्युनियर 17 वर्षाआतील मुले, मुलींची महाराष्ट्र बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा सोमवार, 26 ते बुधवार, 28 जून दरम्यान होत असून या स्पर्धेत राज्यभरातील विविध जिल्ह्यातून सुमारे 500 स्पर्धक स्पर्धेत सहभागी होत असल्याची माहिती छत्रपती शाहू महाराज बॉक्सिंग अॅकेडमीचे प्रशिक्षक बाळा मोरे यांनी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परीषदेत दिली. पत्रकार परीषदेला ओबेनॉल कंपनीचे संचालक अश्विनी कुमार परदेशी, सुनील पाटील, कल्पेश इंगळे, सचिन पाटील आदी उपस्थित होते.
चौथ्यांदा स्पर्धेचे आयोजन
प्रशिक्षक बाळा मोरे यांनी सांगितले की, शहरात छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त यंदा चौथ्यांना बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा होत आहे. यंदा राज्यस्तरीय 17 वर्षाच्या आतील मुला-मुलींच्या स्पर्धेत पुणे, मुंबई, अकोला. अमरातवी, संभाजी नगर, सातारा, कोल्हापूर, पालघर, चंद्रपूर, जळगाव आदी ठीकाणाहून स्पर्धक सहभागी होत आहेत. सोमवार, 26 जूनपासून स्पर्धेला सुरूवात होईल. सकाळी स्पर्धकांची वैद्यकीय तपासणी होईल व त्यानंतरच दुपारी एक वाजेपासून रंभभवनात स्पर्धा सुरू होतील. या स्पर्धांमधून ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळाडू तयार करायचे आहे. त्यासाठी नियोजन सुरू आहे.

चांगले खेळाडू घडावेत
या स्पर्धेला राज्यभरातून आलेल्या स्पर्धकांच्या निवासाची आणि भोजनाची मोफत व्यवस्था आयोजकांनी केली असून रविवारी सकाळपासूनच स्पर्धक रंभभवनात दाखल झाले आहेत. स्पर्धकांसाठी प्लॅटफॉर्म तयार करून दिला जात आहे. यातील स्पर्धक हे भविष्यात मोठ्या स्पर्धामध्ये खेळले पाहिजे, त्यांची निवड झाली पाहिजे, असे बाळा मोरे यांनी सांगितले. छत्रपती शाहू महाराज बॉक्सिंग अॅकेडमीतील अजय सपकाळे व अमन भालेराव यांची स्पोर्टच्या कोट्यामधून मुंबई पोलिसात नोकरी लागली, असेही त्यांनी सांगितले.
