वरणगावात निकृष्ट काम करणार्‍या ठेकेदारावर कारवाई करा

शिवसेनेने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना दिले निवेदन


भुसावळ : भुसावळ तालुक्यातील वरणगाव नगरपरीषदेच्या माध्यमातून 25 कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे सुरू असलेले काम अनियमित आणि दर्जाहीन, निकृष्ट अशा दर्जाचे होत असतानाही प्रशासन स्तरावरून वेळोवेळी सदर कंत्राटदाराची पाठ राखण केली जात आहे. निकृष्ट काम करणार्‍या ठेकेदारावर कारवाई करून काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी शिवसेना (उबाठा) तर्फे शुक्रवारी रोजी प्रांत कार्यालयात जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्याकडे करण्यात आली. वरणगाव शहर शिवसेनेतर्फे शहरप्रमुख संतोष माळी, उपशहरप्रमुख सुनील भोई यांनी हे निवेदन दिले.

रात्रीच्या वेळी होताय निकृष्ट कामे
निवेदनानुसार, मुदत संपूनही कंत्राटदाराला वारंवार मुदतवाढ देण्यात आली व त्यासाठी कोणताही दंड आकारला गेला नाही किंवा कार्यवाही केली गेली नाही. तांत्रिक आराखड्याप्रमाणे जलवाहिनी ही एक मीटर ऐवजी केवळ एक फूट इतक्या खोलीवर टाकण्यात येत आहे. ज्याचे थेट पुरावे सोशल मीडियात आणि नागरीकांच्या प्रत्यक्षात पाहण्यात आले आहे. पाईप लाईनच्या खाली कोणतेही मुरुमची लेव्हलिंग केलेली नाही. प्रस्तावित नकाशाप्रमाणे पाईपलाईन केलेली नाही. जनतेच्या लक्षात येऊ नये म्हणून रात्रीच्या वेळेचा फायदा घेऊन हे निकृष्ट कामे केली जात आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. खोदकाम करून पाईप टाकून झाल्यावर कोणतीही दबाई केली गेली नाही. ज्यामुळे मातीचे ढीग होऊन पावसात सर्व रस्ते चिखलमय होऊन दुचाकी वाहने आणि नागरीकांना त्यामुळे होणार्‍या त्रासाला सामोरे जावे लागेल.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !