भुसावळचे आमदार दमदार ; भुसावळ तालुक्यासाठी फिरते पशूचिकित्सालय मंजूर
पशूपालकांच्या गोठ्यापर्यंत जावून मिळणार उपचार : पशू पालकांना मोठा दिलासा
MLA of Bhusawal is strong ; Mobile Veterinary Clinic approved for Bhusawal Taluka
भुसावळ :केंद्र सरकारच्या पशुस्वास्थ व रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यभरात पहिल्या टप्प्यात 80 फिरत्या पशूचिकित्सालयांना मंजूरी देण्यात आली आहे. यात भुसावळ तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे तालुक्यातील सर्व गावांत फिरत्या पशुचिकित्सालयातून पशुधनावर उपचार होतील. पशुपालकांना यामुळे दिलासा मिळणार आहे. आमदार संजय सावकारे यांनी याबाबत कृषी, पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय मंत्रालयाकडे मागणी केल्यानंतर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
सेवेची गरज नोंदवताच मिळणार सुविधा
केंद्र सरकारच्या योजनेतून आदिवासी व अनूसूचित जाती उपाययोजनांतर्गत पशुधनाच्या प्रमाणात प्राधान्यक्रमाने राज्यातील तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात भुसावळ तालुक्याचाही समावेश आहे. पशुधनावर उपचारासाठी फिरत्या पशुचिकित्सालयास मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेतंर्गत फिरत्या पशुचिकित्सालयात वाहनचालक, परीचर, पदवीधर पशुवैद्यक व एक पशूधन पर्यवेक्षक असे मनुष्यबळ उपलब्ध असेल. पशूपालकांना ही सेवा सहज उपलब्ध होण्यासाठी 1962 हा कॉलसेंटर नंबर दिला जाईल. यावर सेवेची मागणी नोंदवता येईल.

सेवेची तातडीची गरज लक्षात घेवून ही पशुवैद्यकिय सेवा गावपातळीवर पुरवली जाणार आहे. फिरत्या पशुवैद्यकिय पथकामार्फत पुरविण्यात येणार्या सेवांसाठी वेळोवळी शासनाने निर्णयाव्दारे निश्चित केलेल्या सेवाशुल्क आकारले जाईल. हे सेवाशुल्क खाजगी पशुवैद्यकिय सेवेच्या तुलनेत नाममात्र असेल. या फिरत्या पशुचिकित्सालयामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील पशूपालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पशूवर उपचारासाठी पालकांना परीसरातील श्रेणी एक व दोनच्या पशूवैद्यकिय चिकित्सालयात घेवून जावे लागते. मात्र उपचाराची सुविधा आता थेट गोठ्यात मिळणार असल्याने पशुपालन व्यवसाय वाढीसाठी देखील मदत होईल, अशी माहिती आमदार संजय सावकारे यांनी दिली.
