मणिपूरातील अत्याचाराचा निषेध : पीडीत महिलांना न्याय मिळण्यासाठी भुसावळकरांचा मोर्चा
Manipur Atrocities Protest : Bhusawalkars march for justice for oppressed women
भुसावळ : मणिपूरमध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदू मुस्लिम एकता मंचतर्फे यावल रोडवरील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा ते तहसील कार्यालयादरम्यान पायी मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी मागण्यांचे निवेदन तहसीलदार नीता लबडे यांना देण्यात आले. दरम्यान, भुसावळ नागरीक मंचतर्फेही तहसील प्रशासनाला मणिपूर घटनेतील पीडीतांना न्याय मिळण्याच्या मागणीसह अन्य मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले.
अडीच महिन्यानंतरही मणिपूर धुमसतेय
गेल्या अडीच महिन्यांपासून मणिपूर धुमसत असून अद्यापही तेथे शांतता प्रस्थापीत करण्यात यश आलेले नाही. राज्यासह केंद्र सरकारला तेथे शांतता प्रस्थापीत करण्यात यश आलेले नाही शिवाय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील शांततेचे आवाहन तेथे जावून केलेले नाही. अशा निष्क्रीय राज्य व केंद्र सरकारला घरी बसवण्याचा अधिकार संविधानाने आपल्याला दिला असून या घटनेतील दोषींना तत्काळ अटक करून फाशी द्यावी तसेच मणिपूरमधील कुकी समाज आदिवासी असून त्यांच्या अधिकारावर गदा आणण्य साठी त्यांना आपल्या गावातून व प्रदेशातून बेदखल करण्याचे जे षडयंत्र राज्य सरकारच्या व प्रशासनाच्या आशीर्वादाने सुरू असल्याने ते तातडीने थांबवावे, आरोपींवर अॅट्रासिटीसह दंगल व मनुष्यखुनाचे गुन्हे दाखल करावेत तसेच पोलीस प्रशासनातील दोषी अधिकार्यांसह कर्मचार्यांनी संबंधित महिलांना जमावाच्या हवाली शोषण करण्यासाठी हवाली केले त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यासह त्यांना तत्काळ बडतर्फीची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. मणिपूरमधील कुकी समाजावरील अत्याचार थांबले नाहीत व दोषींना शिक्षा झाली नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

यांची निवेदन देताना उपस्थिती
तहसीलदार निता लबडे यांना हिंदू-मुस्लिम एकता मंचचे अध्यक्ष साबीर शेख यांच्या नेतृत्वात यांचे नेतृत्वात उपाध्यक्ष नाना पाटील, चंद्रकांत चौधरी, राजश्री सुरवाडे, अॅड.एहतेश्याम मलिक, अंजुम खान, कुंज बिहारी रावत, डॉ.इमरान खान राऊत, प्रतिभा अग्रवाल, सिकंदर खान, संगीता राजेंद्र भामरे, राष्ट्रवादी महिला सरचिटणीस चांद तडवी, सना परवीन, अकबर सर, संतोष शामराव जाधव, जाकिर बागवान, अर्षद पटेल, मेमन भाई, वैशाली राजकुमार, राजू चौधरी आदी उपस्थित होते.
मणिपूरसह वाराणसी घटनेच्या निषेधार्थ निवेदन
मणिपूरमध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ तसेच वाराणशी येथील सर्वसेवा संघाच्या परीसरावर उत्तर प्रदेश सरकारने बेकायदेशीर पोलीस बळाचा वापर करून कब्जा केल्याच्या निषेधार्थ भुसावळ नागरीक मंचतर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला. तहसीलदार निता लबडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
मणिपूरच्या क्रूर घटनेमुळे भारतीय समाजासमोर जे आव्हान निर्माण झाले आहे त्याचा सामना करून संवैधानिक मूल्य बळकट करणे आवश्यक असून वाराणसी येथील गांधीयन संस्था सर्व सेवा संघाच्या परीसरावर बेकायदा कब्जा करीत गांधी साहित्य रस्त्यावर फेकण्यात आल्याचा निषेध करण्यात आला. निषेध मोर्चात डॉ.सुगन बरंठ, चंद्रकांत चौधरी, दीपक काठे, अरुण दामोधर, कुंज बिहारी , सुधाकर बडगुजर, अॅड.सागर बहिरुणे, सीमा चौधरी, प्रांजळ काठे, धरती चौधरी, माधुरी काठे, आकाश कुरकुरे, निर्मला फालक, योगेंद्र पाटील, महेंद्र पाटील आदींची उपस्थिती होती.
यावल येथे उबाठा महिला सेनेकडून मणिपूर घटनेचा निषेध
यावल : यावल तहसील कार्यालयामध्ये उबाठा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने मणिपूर घटनेचा निषेध करीत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले व या घटनेतील दोषींना फाशी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली भाजपाचे माजी खासदार किरण सोमय्या यांच्या अश्लील व्हिडीओबद्दलदेखील महिलांनी तीव्र संताप व्यक्त करीत त्यांचादेखील निषेध केला आहे
नायब तहसीलदारांना निवेदन
यावल तहसील कार्यालयामध्ये निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांच्याकडे यावल तालुका उबाठा महिला शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. मणिपूर येथे नुकतीच महिलांवर अत्याचाराची घटना घडली. या घटनेचा यावल तालुका उबाठा शिवसेना महिला तीव्र शब्दात निषेध करते. अत्याचार करणार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच हा खटला जलद न्यायालयात चालवून दोषींना भरचौकात फाशी दिली जावी, अशी मागणी त्यांनी केली तसेच भाजपाचे नेते माजी खासदार किरिट सोमय्या यांच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणी देखील त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला. हे निवेदन उबाठा महिला शिवसेना तालुकाप्रमुख रजनी चौधरी, यावलच्या माजी नगराध्यक्ष सुरेखा कोळी, वैशाली चौधरी, रेखा खर्चे, वैशाली चौधरी, द्रोपदाबाई झांबरे, भारती बारी, अनिता कवडीवाले, वैशाली जोशी, बेबी पाटील, मनीषा चौधरींसह शिवसेना उबाठा शिवसेना जिल्हा उपप्रमुख गोपाल चौधरी, शहर प्रमुख जगदीश कवडीवाले, संतोष खर्चे, कडू पाटील, पप्पू जोशी, अप्पासाहेब चौधरी, कामराज घारू सह आदींच्या वतीने देण्यात आले आहे.
