पंढरपूरातील आमदार यात्री निवासाचे काम पूर्ण करा : आमदार एकनाथराव खडसे
Complete the work of MLA Yatri Niwas in Pandharpur : MLA Eknathrao Khadse
मुक्ताईनगर : पंढरपूर येथे भाविकांसाठी बांधण्यात येत असलेले आमदार यात्री निवासाचे बांधकाम निधीअभावी अपूर्णावस्थेत असल्याबाबत आमदार एकनाथराव खडसे यांनी विधानपरीषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला.
भाविकांच्या सोयीसाठी तरी व्हावे बांधकाम पूर्ण
आमदार खडसे म्हणाले की, पंढरपूर (जि.सोलापूर) येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी येणार्या भक्तांच्या रहिवासासाठी मंदिर परीसरात सर्व पक्षीय आमदारांच्या निधीतून आमदार यात्री निवासाचे बांधकाम आराखड्यास 2005 मध्ये मंजुरी मिळाली व त्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्यानंतर मंदिर समितीच्या सर्व्हे न.59/1 मध्ये सं 2009 मध्ये आमदार यात्री निवासाचे बांधकाम सुरू झाले मात्र निधीअभावी गत 13 वर्षांपासून हा प्रकल्प अपूर्णावस्थेत आहे. या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने आमदार यात्री निवासाचे निध अभावी अपूर्णावस्थेत असलेल्या बांधकामास निधी उपलब्ध करून द्यावा तसेच यात्री निवासी बांधकाम पूर्ण करण्याबाबत कोणती कार्यावाही केली व भाविक भक्तांच्या सोयीसाठी हे बांधकाम पूर्ण करण्याची त्यांनी मागणी केली.

निधीअभावी काम रखडले
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, गेल्या 13 वर्षांपासून हा प्रकल्प अपूर्णावस्थेत आहे. आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत एकूण चार इमारतींच्या बांधकामास 11 जुलै 2007 रोजीच्या शासन निर्णयान्वये रुपये सात कोटी 14 लक्ष रकमेस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. प्राप्त निधीच्या प्रमाणात अंदाजपत्रक तयार करून त्यास तांत्रिक मान्यता देण्यात आली. त्यानुसार कामे पूर्ण करून इमारत वापरण्यायोग्य करून हस्तांतरीत केली आहे तसेच उर्वरीत निधी अद्याप उपलब्ध झालेला नसल्याने, उर्वरित तीन इमारतींचे बांधकाम हाती घेण्यात आले नाही. चार पैकी एका इमारतीचा ताबा विभागीय आयुक्त, पुणे व सोलापूर जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार 21 नोव्हेंबर 2013 अन्वये कार्यकारी अधिकारी, श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर यांच्याकडे हस्तांतरीत केला आहे.
