वराडसीम विकासोत 35 लाखांचा अपहार : सचिवासह लिपिकाविरोधात गुन्हा


Embezzlement of 35 lakhs in Varadseem development : Crime against clerk along with secretary भुसावळ : भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या तत्कालीन सचिवासह लिपिकाने संगनमत करीत सभासदांकडील कर्ज रक्कम परस्पर वसुल करीत तब्बल 35 लाख 21 हजार 859 रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गुरुवारी सायंकाळी लेखा परीक्षक प्रमोद पाटील यांच्या फिर्यादीवरून भुसावळ तालुका पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे फसवणूक प्रकरण
भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे तत्कालीन सचिव भास्कर सीताराम पाटील (जामनेर रोड, भुसावळ) व लिपिक तेजश्वर रामदास ढाके (वराडसीम, ता.भुसावळ) यांनी 21 एप्रिल 2011 ते 20 मे 2019 दरम्यान संस्थेत कार्यरत असताना पदाचा दुरुपयोग केला. बनावट व खोटे कागदपत्रे तयार करून संस्थेतील सभासद यांच्याकडून परस्पर कर्ज वसुलीच्या रकमा जमा केल्या तसेच जमा केलेल्या रकमा या संस्थेत जमा केल्या नाही शिवाय छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणि महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना यातील देखील बनावट कागदपत्रांच्या आधारे सभासदांच्या नावावर कर्ज येणे बाकी दिसत असल्याचे समोर आले.







या बनावट व खोटे कागदपत्राचे आधारे त्यांनी अफरातफर करून तब्बल 35 लाख 21 हजार 859 रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीला आले. या संदर्भात गुरुवारी सायंकाळी 7 वाजता भुसावळ येथील सहकारी संस्थेचे लेखापरीक्षक अधिकारी प्रमोद देविदास पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात तत्कालीन सचिव भास्कर सीताराम पाटील आणि लिपिक तेजश्वर रामदास डाके या दोघांविरोधात अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सतीश कुलकर्णी करीत आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !