वाळू चोरी करून डंपरद्वारे वाहतूक : भुसावळ तालुका पोलिसात तिघांविरोधात गुन्हा
Stealing sand and transporting it by Dumper : Crime Against three in Bhusawal taluka police भुसावळ : अवैधरीत्या वाळू वाहतुकीबाबत कठोर कारवाईचे निर्देश भुसावळ प्रांतधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिले आहेत. त्यानुषंगाने महसूल पथकाला बंदोबस्त पुरवण्यात आला असून सोमवारी सकाळी अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारा डंपर ताब्यात घेत या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने अवैधरीत्या वाळू वाहतूक करणार्यांच्या गोटात खळबळ उडाली आहे. ही कारवाई साकेगाव-जोगलखेडा रस्त्यावरील सार्वजनिक जागी सोमवारी सकाळी 11.35 वाजेच्या सुमारास करण्यात आली. 24 तास शहरासह तालुक्या अवैधरीत्या गौण खनिजाची वाहतूक करणार्यांवर पथकाकडून कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिली.
पसार होण्यापूर्वीच आवळल्या मुसक्या
महसूल पथक अवैध वाळू वाहतुकदारांवर कारवाईसाठी बाहेर पडल्यानंतर सोमवारी दुपारी सकाळी 11.30 वाजता (एम.एच.19 झेड.1644) या वाहनातून जोगलखेडा-वाघूर नदीपात्रातून चोरट्या मार्गाने गौण खनिज वाहून नेले जात असताना साकेगाव शिवारातील गट क्रमांक 10/2 शेत जमिनीजवळ पथकाने बंदोबस्तात वाहन अडवले. यावेळी वाहनात सुमारे एक ब्रास वाळू होती व चालकाने वाहनातील वाळू खाली करून पळण्याचा प्रयत्न केला मात्र पथकाने धाव घेत चालकासह क्लीनरला ताब्यात घेत वाहन तहसील कार्यालयात आणले. याप्रकरणी कुर्हेपानाचे मंडळाधिकारी योगीता पाटील यांच्या फिर्यादीवरून डंपर मालक संदीप बेनीलाल परदेशी (पसार) व चालक राजेंद्र शिवराम आढाळे (39, साकेगाव) व क्लीनर सुनील नथू परदेशी (45, साकेगाव) यांच्याविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार संजय भोई करीत आहेत.








