गोजोरा गावात धाडसी घरफोडी : 12 लाखांचे सोने लांबवले


Daring house burglary in Gojora Village :  Gold Worth 12 Lakhs recovered भुसावळ : शहरी भागातून चोरट्यांनी आपला मोर्चा ग्रामीणमध्ये वळवला आहे. साकेगाव येथे किराणा दुकानातून एक लाख 30 हजारांची रोकड चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच गोजोरा येथे बंद घर फोडून चोरट्यांनी तब्बल 195 ग्रॅम सोन्याचे दागिने लांबवल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. आजच्या बाजारभावानुसार या सोन्याची किंमत सुमारे 12 लाखांच्या घरात आहे. धाडसी घरफोडीनंतर भुसावळ तालुका प्रभारी सतीश कुलकर्णी यांनी सहकार्‍यांसह धाव घेतली. यावेळी ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आल्यानंतर तज्ज्ञांना एका चोरट्यांचे ठसे आढळल्याचे सूत्रांनी सांगितले.

माहितगार चोरट्यांनी घरफोडी केल्याचा संशय
मालतीबाई अभिमन चौधरी (57, गोजोरा, ता.भुसावळ) या सेवानिवृत्त पती, विधवा मुलगी व नातवांसह वास्तव्यास गोजोर्‍यात वास्तव्यास आहेत. पुणेस्थित मुलाला मुलगी झाल्यानंतर नातीला पाहण्यासाठी चौधरी कुटूंब 26 जुलैपासून पुण्याला गेल्याने घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली. 7 ऑगस्ट रोजी परीचितांना घराचे गेट व दरवाजा उघडा असल्याची माहिती चौधरी कुटूबियांना कळवल्यानंतर त्यांनी नातेवाईकांना खातरजमा करण्यास सांगितल्यानंतर घरफोडी झाल्याचे स्पष्ट झाले. चौधरी कुटूंब त्यानंतर मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता गोजोर्‍यात दाखल झाल्यानंतर त्यांना घरातील सर्व किंमती ऐवज चोरीला गेल्यानंतर मोठा धक्काच बसला.







195 ग्रॅम सोन्याचे दागिणे लंपास
चोरट्यांनी घराच्या गेटचे व मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरातील लोखंडी कपाटातून 195 गॅ्रम वजनाचे सोन्याचे दागिणे लांबवले. त्यात 20 ग्रॅम वजनाचा व 60 हजार रुपये किंमतीचा चपला हार, पाच ग्रॅम वजनाची व 14 हजार रुपये किंमतीची सोन्याची ठुशी, 27 ग्रॅम वजनाच्या व 75 हजार 600 रुपये किंमतीच्या सोन्याच्या पाच अंगठ्या, 25 ग्रॅम वजनाची व 70 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत, 10 ग्रॅम वजनाचे व 30 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे लॉकेट,
पाच ग्रॅम वजनाचे व 15 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे लॉकेट, 15 गॅ्रम वजनाचे 45 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे टोंगल, 13 हजार 600 रुपये किंमतीचे पायातील पैंजण, 20 ग्रॅम किंमतीचा व 60 हजार रुपये किंमतीचा चपला हार, चार हजार रुपये किंमतीचा चांदीचा करदोडा, 20 ग्रॅम वजनाची व 56 हजार रुपये किंमतीची मंगलपोत, 18 ग्रॅम वजनाची व 54 हजार रुपये किंमतीचा नेकलेस, सहा ग्रॅम वजनाच्या व 16 हजारांच्या वाट्या, 15 ग्रॅम वजनाचे व 45 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे टोंगल, साडेचार हजार रुपये किंमतीच्या व दिड ग्रॅमच्या बाह्या, 26 हजार 400 रुपये किंमतीचा चांदीचा आकडा, सिंडिकेट व कॅनरा बँकेचे पासबुक तसेच दोन लाखांची एफडी असा एकूण सहा लाख 19 हजार 600 रुपयांचा ऐवज लांबवला. याप्रकरणी मालतीबाई चौधरी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !