भुसावळातील विनयभंग प्रकरणी पसार आरोपी जाळ्यात
भुसावळ : घरात बेकायदा प्रवेश करून विनयभंग केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयीत आरोपी नईम ऊर्फ (भुर्या) रज्जाक शाह (26, रा.गौसिया नगर, भुसावळ) यास शनिवारी सायंकाळी बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. 16 जानेवारी रोजी या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र आरोपी पसार झाला होता. आरोपी शहरात आल्याची माहिती मिळताच त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे, उमाकांत पाटील, तुषार पाटील, कृष्णा देशमुख, प्रशांत परदेशी आदींच्या पथकाने केली. तपास नाईक संदेश निकम करीत आहेत. दरम्यान, अटकेतील आरोपी हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसात चोरी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.
