देवगावात भरधाव आयशरने सहा वर्षीय चिमुरडीला चिरडले


पारोळा : रस्त्याच्या कडेला चालणार्‍या सहा वर्षीय चिमुरडीला चिरडल्याची घटना पारोळा तालुक्यातील देवगाव येथे घडली. पूजा अनिल भील (6) असे मयत चिमुरडीचे नाव आहे.

असा घडला अपघात
पारोळा तालुक्यातील देवगावपासून एक किलोमीटर अंतरावरील वस्तीत शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास देवगाव येथील पूजा ही गावातील वसंत जिभाऊ नगर परीसरात असलेल्या रस्त्याच्या कडेला चालत होती. या वेळी देवगाव फाट्याकडून देवगावकडे तामसवाडी येथील नीलेश संजय बेलदार ( 24) या मद्यधुंद ट्रक चालकाने त्याच्या ताब्यातील आयशर गाडीने पूजाला मागून जबर धडक दिली. या अपघातात पूजा गंभीर जखमी झाली. परिसरातील नागरिकांनी लगेच घटनास्थळावरुन चालकाला ताब्यात घेतले.
जखमी बालिकेला रुग्णवाहिका चालक ईश्वर ठाकूर यांच्या 108 रुग्णवाहिकेतून पारोळा कटीर रुग्णालय येथे दाखल केले. परंतु वाटेतच तिचा मृत्यू झाला. या अपघातानंतर संतप्त झालेल्या जमावाने मद्य प्राशन करून वाहन चालवणार्‍या चालकाला चांगलाच चोप दिला तर वाहनाची तोडफोड केली. पूजा ही जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिलीत शिक्षण घेत होती. याप्रकरणी पूजाचे वडील अनिल भीमा भील यांच्या फिर्यादीवरून वाहन चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. चालकाला अटक करण्यात आली आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !