भुसावळ शहर व तालुक्यातील 37 उपद्रवींना नवरोत्सवात ‘दहा दिवस शहरबंदी’
प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांचे आदेश : नवरात्रोत्सव शांततेत पार पाडण्यावर पोलिसांचा भर
37 miscreants in Bhusawal city and taluka are under ‘ten-day curfew’ during Navarotsav भुसावळ : नवरात्रोत्सव सण उत्साहात, आनंदात व निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाने 37 उपद्रवींना भुसावळ शहर व तालुका बंदी करण्याबाबत प्रांताधिकारी प्रशासनाकडे नुकतेच प्रस्ताव सादर केले होते. या प्रस्तावांना प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी मंजुरी दिली आहे. भुसावळ शहर, तालुका व बाजारपेठ हद्दीतील सामाजिक शांततेला धोका ठरू पाहणारे तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पोलिसांच्या रेकॉर्डवरील 37 संशयिताना 16 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर 2023 दरम्यान शहर व तालुकाबंदी करण्यात आली आहे. या आदेशाने उपद्रवींच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली असून आदेशाची अंमलबजावणी करण्यास यंत्रणेने सुरूवात केली आहे.
उत्सव निर्विघ्न पार पडण्यावर प्रशासनाचा भर
पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या सूचनेनुसार पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी नवरात्रोत्सव आनंदात व शांततेत पार पडण्यासाठी काटेकोर नियोजन केले आहे. उत्सवापूर्वीच शहरातील तीनही पोलिस ठाण्यातील प्रभारी अधिकार्यांची बैठक घेवून त्यांना त्या-त्या हद्दीतील उपद्रवींना उत्सव काळात शहराबाहेर ठेवण्यासाठी प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना पिंगळे यांनी केल्या होत्या. त्यानुषंगाने भुसावळ शहरचे निरीक्षक गजानन पडघण, बाजारपेठचे बबन आव्हाड व भुसावळ तालुक्याचे बबन जगताप यांनी त्यानुषंगाने 37 उपद्रवींना उत्सव काळात दहा दिवस शहर व तालुका बंदी करण्याबाबतचे प्रस्ताव सादर केल्यानंतर सोमवारी त्यास प्रांताधिकार्यांनी मंजुरी दिली.

आदेशाचे उल्लंघण केल्यास गुन्हा
भुसावळ तालुका पोलिसांनी पाच तर बाजारपेठ 14 व शहर पोलिसांनी 18 उपद्रवींना शहर बंदी करण्याबाबत प्रस्ताव सादर केले होते. या प्रस्तावाचे प्रांताधिकार्यांनी अवलोकन केल्यानंतर 37 संशयितांना 16 ते 26 ऑक्टोबर दरम्यान शहर व तालुक्यात येण्यास मनाई केली आहे. या आदेशाचे उल्लंघण केल्यास संशयिताविरोधात पोलिसात पुन्हा गुन्हा दाखल केला जाणार आहे. पोलिसांकडून प्रांताधिकार्यांच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
या उपद्रवींना उत्सव काळात शहर बंदी
शहर व तालुक्यात बंदी करण्यात आलेल्यांमध्ये मुकेश भालेराव, समाधान कोळी, सीताराम सोनवणे, अशोक तायडे, कुणाल परदेशी, आकाश ढिवरे, नवीन लोखंडे, ओमप्रकाश चापरे, गणेश कवडे, योगेश कोळी, कैलास सूर्यवंशी, सौरभ कुटे, नवाबलाल गवळी, प्रमोद नरवाडे, गौरव बढे, करण इंगळे, भिका पाटील, इम्रान पिंजारी, आनंदा पवार, निलेश बसवे, सुरज जाधव, विवेक टाक, राहुल पाटील, हर्षल सावकारे, पवन चौधरी, अनिकेत सोनवणे, आनंद सूर्यवंशी, धीरज खंडारे, निरज जाधव, युवराज बिर्हाडे, वसीम पटेल, प्रकाश सावंत, रवींद्र मोरे, दीपक खरारे, योगेश जाधव, रमजान गवळी यांचा समावेश आहे.
आदेश मोडल्यास गुन्हा : पोलिस उपअधीक्षक पिंगळे
शहर, बाजारपेठ व तालुका हद्दीतील उपद्रवींना उत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी शहर व तालुक्याबाहेर ठेवण्याचे नियोजन पोलिस प्रशासनाने केले आहे. आदेशाचे उल्लंघण करताना संशयित दिसल्यास त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल तसेच उत्सव काळात व विसर्जन मिरवणुकीत पोलिसांची करडी नजर असेल, असे पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे म्हणाले.

