भुसावळ पालिकेच्या वाढीव करवाढीला विरोध : शिशिर जावळे
15 नोव्हेंबरपर्यंत नागरीकांना हरकती दाखल करण्याचे आवाहन
Opposition to increased tax hike of Bhusawal Municipality: Shishir Jawle भुसावळ : भुसावळ नगरपालिकेतर्फे कोरोना काळात रखडलेल्या शासनाच्या कर निर्धारणानुसार तीन वर्षांनी मालमत्तांचे नुकतेच पुनर्मूल्यांकन करण्यात आले. त्यात पालिका हद्दीत वाढलेल्या नवीन व जुन्या मालमत्तांवर दहा टक्के कर वाढ जाहीर करण्यात आली मात्र या करवाढीला सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी विरोध दर्शवला आहे. 2023-24 व 2026-27 या चार वर्षांसाठी जुन्या मालमत्ता भूखंड सुधारणा व नवीन बांधकाम झालेल्या मालमत्तांचे मोजमाप करून भुसावळ पालिकेने सप्टेंबरमध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली. पालिका हद्दीत वाढल्या नवीन मालमत्ता व जुन्या मालमत्तांवर दहा टक्के करवाढ करण्याचा निर्णय भुसावळ नगरपालिका प्रशासनाने घेतला असून 15 नोव्हेंबरपर्यंत नागरीकांकडून हरकती मागवण्यात आल्या आहेत.
मूलभूत सोयी-सुविधांची बोंब
गेल्या 20 वर्षांपासून सातत्याने ‘अ’ दर्जा असलेल्या भुसावळ नगरपालिकेकडून शहरातील नागरीरकांना कुठल्याही प्रकारच्या मूलभूत सेवा-सुविधा कराच्या मोबदल्यात पुरविल्या जात नाही तसेच कर पत्रकावर नमूद असलेल्या विविध सेवा सुविधा न पुरविता कर वसूल केला जातो. अजूनही भुसावळ शहरांमध्ये कराच्या मोबदल्यात नागरीकांना पिण्याचे पाणी, चांगले रस्ते, वीज, गटारी, स्वच्छता वगैरे सुविधा पुरविल्या जात नसल्याने भुसावळ पालिकेकडून नागरीकांना विनाकारण मालमत्ताकरांमध्ये दहा टक्के वाढ करून वेठीस धरले जात आहे. त्यामुळे भुसावळ पालिका प्रशासनाने ही करवाढ त्वरीत रद्द करून आधी नागरीकांना कराच्या मोबदल्यात आवश्यक मूलभूत सेवा सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथराव शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पाठविले असल्याचे शिशिर जावळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे. भुसावळकर नागरीकांनी हजारोंच्या संख्येने 15 नोव्हेंबर 2023 पर्यंत याबाबत आपल्या हरकती व आक्षेप भुसावळ नगरपालिकेत नोंदवावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.


