किनगावात मलंग शहा बाबा यांचा ऊर्स शरीफ मोठ्या उत्साहात

बालकांचे नवस फेडण्यासाठी सर्वधर्मीयांची उसळली गर्दी


यावल : यावल तालुक्यातील किनगाव येथे मंगळवारी सर्व धर्मीयांची श्रद्धा असलेल्या मलंग शहा बाबा यांचा ऊर्स शरीफ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच चुंचाळे रस्त्यावरील दर्गाहवर बालकांचे नवस फेडण्यासाठी सर्वधर्मीय बांधवांची गर्दी झाली. सवाद्य मिरवणूक काढत विविध पदार्थात बालकांची तुला करण्यात आली व दर्गाहवर दर्शनासाठी गर्दी उसळली होती.

नवस फेडण्यासाठी उसळली गर्दी
किनगाव, ता.यावल या गावात चुंचाळे रस्त्यावर सर्वधर्मीय बांधवांची श्रद्धा असलेली हजरत मलंग शाह बाबा यांची दर्गाह आहे. सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील मंगळवारी या दर्गाहवर ऊर्स शरीफ साजरा करण्यात आला. सकाळपासूनच या दर्गाहावर सर्वधर्मीय बांधवांच्या वतीने मानलेले नवस फेडण्याकरीता सवाद्य मिरवणूक काढत बालकांची पेढा, बुंदी, तांदूळ, जलेबी, गुळ, साखरसह विविध पदार्थात तुला करण्यात आली. नवस फेडण्यात आले तर दर्शनासाठीदेखील सर्वधर्मीय बांधवांनी प्रचंड गर्दी केली. दर्गाह परीसरातच प्रसादाचे वितरण आयोजकांकडून करण्यात आले. ऊर्स शरीफनिमित्त गावात विविध प्रकारचे लहान मुलांची खेळणी, मोठ्यांचे झोके मनोरंजनाची विविध साधने गावात दाखल झाली. दर्गाहवर रात्री साडेनऊ वाजेपर्यंत नवस फेडणे आणि दर्शनासाठी भाविकांची गर्दी कायम होती. ऊर्स शरीफ शांततेत पार पडण्यासाठी यावल पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मुजफ्फर खान, हवालदार वासुदेव मराठे, नरेंद्र बागुले आदींनी गावात चोख बंदोबस्त ठेवला होता.



कव्वालीचा कार्यक्रम उत्साहात
या ऊर्स शरीफनिमित्त सुन्नी जामा मस्जिद चौकात कव्वालीचा कार्यक्रम झाला. रात्री नऊ वाजेला प्रसिद्ध कव्वाल अनिस शोला (नागपूर) विरुद्ध मध्यप्रदेश खंडवा येथील निशाद नाज यांच्यात कव्वालीचा मुकाबला आयोजित करण्यात आला. हा मुकाबला चांगलाच रंगला. मोठ्या संख्येने कव्वालीचा मुकाबला पाहण्यासाठी श्रोत्यांनी गर्दी केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !