अंजाळेनजीक चारचाकी व दुचाकीचा अपघात : देऊळगावचा तरुण ठार
यावल : यावल-भुसावळ मार्गावरील अंजाळे घाटाच्या पुलावर मोटरसायकल व चारचाकीत अपघात होवून त्यात देऊळगाव गुजरी येथील तरुण ठार झाला. यावल पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. राजु भिका शिंदे (30, देऊळगाव गुजरी, ता.जामनेर) असे मयताचे नाव आहे.
अपघातात तरुण ठार
यावल-भुसावळ मार्गावरील अंजाळे गावापुढील मोर नदीवरील नवीन पुलावर शुक्रवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास यावलकडून भुसावळकडे जाणार्या मारूती ईको या चार चाकी वाहन (क्रमांक एम.एच. 01 सी.पी.3218) ने भुसावळकडून येणार्या मोटरसायकल (क्रमांक एम.एच. 19 ई.डी. 0432) ला धडक दिल्याने या अपघातात मोटरसायकल चालक राजु भिका शिंदे (30, देऊळगाव गुजरी, ता.जामनेर) हा गंभीर जखमी झाला. त्यास भुसावळ येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी विकास विश्वनाथ शिंदे (आमोदे, ता.यावल) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलिसात मारूती ईको चारचाकी वाहन चालक सचिन संजय कोळी (अंजनसोडा, ता.भुसावळ) विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नितीन चव्हाण करीत आहे.


