भुसावळात डाऊन कुशीनगर एक्स्प्रेसच्या पँट्रीकारमध्ये तोडफोड

तोडफोड करणार्‍यांचा यंत्रणेकडून कसून शोध : पँट्रीकारमध्ये बसू न दिल्याच्या रागातून कृत्य


Pantry car of Down Kushinagar Express vandalized in Bhusawal भुसावळ : अप कुशीनगर एक्स्प्रेसच्या पँट्रीकारमध्ये बसू देण्यास मज्जाव केल्याच्या वादातून परतीच्या प्रवासात या गाडीतील पँट्रीकार मॅनेजरला मारहाण करण्यात आली होती शिवाय त्याच्याकडील रोकड लूटण्यात आल्याचा प्रकार बुधवार, 27 रोजी भुसावळ रेल्वे स्थानकावर घडला होता. लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर संशयितांचा शोध सुरू करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पँट्रीकारमध्ये बसू न दिल्याच्या वादातून राडा
सूत्रांच्या माहितीनुसार, मंगळवार, 26 रोजी अप कुशीनगर मुंबईकडे निघाल्यानंतर पॅन्ट्री कार व्यवस्थापकाने काही जणांना पॅन्ट्रीकार बोगीत बसू देण्यास नकार दिला होता व त्यातून जोरदार वाद झाल्याने याबाबत लोहमार्ग पोलिसात नोंदही करण्यात आली मात्र त्यानंतर संशयितानी बुधवार, 27 रोजी सकाळी साडेआठ वाजता डाऊन कुशीनगर एक्स्प्रेस भुसावळ रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक सहावर आल्यानंतर मॅनेजरला मारहाण केली तसेच पॅन्ट्रीकारच्या खिडकीचे काच तोडफोड करून सामानही अस्ताव्यस्त फेकला.



या घटनेत पेन्ट्री कारचे असिस्टंट मॅनेजर राहुल सिंग वीरेंद्र सिंह (24 जरगाव, जि.जालौन, उत्तरप्रदेश) यांचे 45 हजार रुपये रोख, तीनशे रुपये किंमतीची काळ्या रंगाची बॅग, परवाना, स्टीलची कॅन आणि बाटल्या लंपास झाल्या. सिंह यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांचा सीसीटीव्ही फुटेजद्वारे शोध सुरू आहे. तपास पोलिस निरीक्षक विजय घेर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रवीण निकाळजे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !