श्री चक्रधर स्वामी अवतारदिन शासन स्तरावर होणार साजरा !


सादिक पिंजारी

खिर्डी : महानुभाव पंथ प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतारदिन शासनाने सर्वत्र साजरा करावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून सुरू होती. यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. यंदा शासनाने मागणीची दखल घेत श्रीचक्रधर स्वामी अवतारदिनाचा परिपत्रकात समावेश केला. ज्यांनी खर्‍या अर्थाने मराठीला धर्मभाषेचा दर्जा देऊन राजसिंहसनावर बसविले, त्यांचा अवतारदिन शासन स्तरावर साजरा व्हावा, ही महानुभाव पंथातील मान्यवर संत- महंत, आचार्य आचार्य मंडळींच्या शुभचिंतनाने मागणी शासनाकडे रेटुन धरल्यानंतर या मागणीला यश आले आहे.



पाठपुराव्याला आले यश
समाज सुधारणेची सुरुवात करून मानवतेचा संदेश देणारे सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचे महाराष्ट्राच्या जङणघडणीत अमूल्य योगदान आहे. सत्य, अहिंसा, मानवता, समानता या मूल्यांतून दिलेल्या शिकवणूकीतून समाजप्रबोधन झाले. महाराष्ट्रात तीन टक्के तर देशात दिड कोटी तर जगभरात मोठ्या संख्येने महानुभाव उपासक असूनसुद्धा शासन परिपत्रकात अवतारदिनाचा समावेश नसल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली. लोकप्रतिनिधींकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्यानंतर यंदाच्या हिवाळी अधिवेशन काळात अंतिम मंजूरीसाठी ही फाईल मुख्यमंत्री कार्यालयात सह सचिव व्यंकटेश भट यांच्याकडे पाठविण्यात आली. त्यावर सोमवार. 18 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीचक्रधर स्वामी अवतारदिनाचा समावेश करण्यासंबंधी सामान्य प्रशासन विभागाला लिखित निर्देश दिले होते. कवीश्वरकुलाचार्य महंत श्रीकारंजेकर बाबा, शिवसेनेच्या (शिंदे गट) ज्ेष्ठ पदाधिकारी शुभांगी नांदगावकर, प्रशासकीय अधिकारी साजनकुमार शेंडे यांच्या विशेष प्रयत्नांतून 2024 च्या परिपत्रकात श्रीचक्रधर स्वामी अवतारदिनाचा समावेश करण्यात आला.

मराठी प्रेमींसह अभिमानाचा बाब
मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय/ निमशासकीय कार्यालयात, राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात भाद्रपद शु.द्वितीया या तिथीला अवतारदिन साजरा करण्यात येईल. पंथीय साधकांसह मराठीप्रेमींसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. यासंदर्भातील स्वतंत्र परिपत्रक शासन लवकरच काढेल, असे महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव र.रा.पेटकर यांनी कळविले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !