हात-मोजे बनवणार्‍या कंपनीत भीषण आग : सहा कामगारांचा होरपळून मृत्यू


छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एमआयडीसीमध्ये हातमोजे बनविणार्‍या कंपनीत शनिवारी मध्यरात्री दोन वाजेनंतर लागलेल्या भीषण आगीत सहा कामगारांचा होरपळून मृत झाले आहेत. अग्नितांडवात मृत झालेल्यांमध्ये एका ज्येष्ठ कामगार आणि एका अठरा वर्षीय युवकाचाही समावेश आहे.

यांचा ओढवला मृत्यू
सूत्रांच्या माहितीनुसार, मुश्ताक शेख (वय 65), कौशर शेख (वय 32), इक्बाल शेख (वय 18), ककनजी (वय 55), रियाजभाई (वय 32), मरगुम शेख (वय 33) अशी मृतांची नावे आहेत. घाटीत दाखल केलेले मृतदेह जळीत नव्हते. काही कामगारांचा धुरात गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.



झोपेत असताना लागली आग
वाळूज औद्योगिक परिसरात सनशाईन एंटरप्राईज सी 216 या हँडग्लोज बनवणार्‍या कंपनीमध्ये सुमारे 20 ते 25 कामगार काम करतात. 10 कामगार कामगार कंपनीमध्ये राहतात. सगळे झोपेत असताना अचानक आग लागली. काही झोपलेल्या कामगारांना गरम वाफ लागल्याने जाग आली, तेव्हा त्यांना आग लागल्याचे लक्षात आले. यानंतर जीव वाचण्यासाठी कामगारांची पळापळ सुरु झाली. बाहेर निघण्याच्या मार्गावरच आग लागल्याने बाहेर पडणे कुणालाही शक्य झाले नाही. याचवेळी कंपनीत असलेली एक सीडी लावून कंपनीचे वरील पत्रे बाजूला करून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. पत्र्यावर येऊन एका झाडाच्या मदतीने चार लोकं बाहेर पडले मात्र, इतर लोकांना बाहेर पडणं शक्य झाले नाही.

श्वान व अन्य कामगार दगावले
अग्निशमन दलाचे जवान हे रांगत रांगत वरच्या मजल्यावर पोहोचले. जेव्हा या जवानांनी खोलीत पाहिलं तेव्हा त्यांना समोर अत्यंत हृदयद्रावक असं दृश्य दिसलं. त्या खोलीत सहा जण मृतावस्थेत दिसले. त्यात एक श्वानही होता. त्याचे पाय वर झालेले होते, तेव्हाच जवानांना कळालं की ते जिवंत नसतील. या फॅक्ट्रीच्या चारही बाजुने आग लागलेली होते आणि हे लोक आत पहिल्या मजल्यावर अडकलेले होते, अशी माहिती अधिकार्‍याने दिली. ही आग कशी लागली याबाबत सध्या काहीही माहिती नसल्याचे अधिकार्‍यांनी सांगितलं.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !