यावल वनविभागाची मोठी कारवाई : पाच लाखांचे खैर लाकूड जप्त
अंधारात वाहन सोडून चालक पसार : लाकूड तस्करी ऐरणीवर
Big action of Yaval Forest Department : Khair wood worth five lakhs seized यावल : यावल वनपालांच्या गस्ती पथकासह यावल पश्चिम रेंज स्टाफने गोपनीय माहितीनंतर लाकडाची तस्करी रोखत तब्बल पाच लाखांचे खैर लाकूड जप्त केले तर वनविभागाच्या पथकाला पाहताच संशयित चालक अंधारात बोलेरो वाहन सोडून पसार झाला. सूत्रांच्या माहितीनुसार, किनगावकडे येत असलेल्या बोलेरो पीकअप (एम.एच.04 जी.आर.4353) येत असताना वनविभागाने थांबवण्याचा इशारा केल्यानंतर अंधारात वाहन सोडून चालक पसार झाला. वाहनात पाच घन मीटर खैर जातीचे लाकूड आढळले असून त्याची बाजारभावानुसार किंमत पाच लाख रुपये आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे वनसंरक्षक ऋषिकेश रंजन, यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख, धुळे दक्षता पथकाचे विभागीय वनाधिकारी प्रथमेश हडपे, यावल गस्ती पथकाचे वनक्षेत्रपाल सहाय्यक वन संरक्षक अजय बावणे यांच्या मार्गदर्शनाखाली गस्ती पथकाचे वनपाल आर.बी.थोरात, वाघझिरा वनपाल विपूल पाटील, निंबादेवी वनरक्षक अक्षय रोकडे, मनुदेवी वनरक्षक चेतन शेलार, वाहन चालक योगीराज तेली, पोलिस कॉन्स्टेबल सचिन तडवी यांनी केली.


