शबरी माताची बोरे घेवून महामंडलेश्वर जनार्दन महाराज अयोध्येला रवाना
फैजपूर : प्रभू श्रीराम व माता शबरी भेटीचे भारतीय संस्कृती व सनातन धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. भक्त व भगवंत यांच्यातील अतूट विश्वास व आस्था तसेच सामाजिक समरसतेचे हे खूप मोठे प्रामाणिक उदाहरण आहे. संपूर्ण जगासाठी ही भेट कल्याणकारी क्षण आहे. अशा पवित्र शबरीधाम या ठिकाणी प्रभू रामाचे आगमन पदयात्रेचा शुभारंभ हा वारसा फाटा, पिंपळनेर, तालुका साक्री, जिल्हा धुळे येथून झाला. फैजपूर येथील सतपंथ मंदिर संस्थानचे गादिपती तथा अखिल भारतीय संत समितीचे खजिनदार सतपंथरत्न महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या सोबत हजारो आदिवासी बांधव श्रीरामाच्या जयघोषात 13 जानेवारी 24 रोजी पायी निघाले.
आदिवासी बांधवांचा सक्रिय सहभाग
या पदयात्रेत शबरीमातेच्या कुळात जन्मलेल्या सर्व आदिवासी बांधव आपल्या पारंपरीक पोशाखात सहभागी झाले होते. या पदयात्रेत शबरी माता मंदिराचे स्वामी अशीमानंदजी (शिंदखेडा) येथील योगी दत्तनाथजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्याहस्ते सरपंच परीवाराकडून उपस्थित आदिवासी बंधूंना श्रीराम, लक्ष्मण व शबरी मातेचा फोटो भेट म्हणून देण्यात आला. शबरीधाम येथे उपस्थित सर्व आदिवासी बंधूंसोबत उपस्थित संत महात्म्यांनी भोजनाचा एकत्रीत आनंद घेतला. शबरीधाम आनंदोत्सवात धर्म जागरण प्रांत संयोजक संदीप लासूरकर, परीयोजना प्रमुख डॉ.विकास चौधरी, धर्म जागरण विधी प्रमुख अॅड.कालिदास ठाकूर यांच्यासह पंकज साखरे, दीपक साखरे, समाधान मोरे, परीक्षीत बर्हाटे तसेच भिल्ल व आदिवासी समाजातील जळगाव, धुळे, नंदुरबार, डांग जिल्ह्यातील असंख्य आदिवासी बांधव उपस्थित होते.


शबरीची बोरे निघाली अयोध्येला
14 जानेवारी 2024 रोजी शबरीधाम येथून महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज अयोध्येसाठी रवाना झाले. प्रभू श्रीराम जन्मभूमी पूजन सोहळ्याला जाताना महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांनी खान्देशात असलेल्या प्रमुख तीर्थावरील माती व प्रमुख नद्यांमधील जल घेऊन प्रस्थान केले होते तर आता प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाताना आदिवासी बांधवांसोबत शबरीधाम येथे पायी प्रवास करत शबरी मातेचे दर्शन घेऊन प्रेमाची बोरे श्रीरामांना भेट देण्यासाठी अयोध्येला निघाले. हा क्षण तेथे उपस्थित सर्वांसाठी अत्यंत अनमोल असा होता.