आगामी निवडणुकांसाठी जळगाव जिल्हा प्रशासन सज्ज : 23 जानेवारी रोजी मतदार यादी प्रसिद्ध होणार
जिल्ह्यात 3564 मतदान केंद्र : 1782 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग : जिल्ह्यात 9339 बॅलेट युनिट, 5450 कंट्रोल युनिट आणि 5733 व्हीव्हीपीएटी मशिन
Jalgaon district administration ready for upcoming elections : Voter list will be released on January 23 जळगाव : जळगाव जिल्हा निवडणूक प्रशासन आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज झाले आहे. मंगळवर, 23 रोजी नवीन मतदारांच्या समावेशासह मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. सध्या पुरूष व महिला मिळून 34 लाख 91 हजार 98 मतदार आहेत. यात सुमारे 80 हजार नव मतदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात 2019 लोकसभा निवडणूकीत 3559 मतदान केंद्र होती. या निवडणुकीत पाच मतदान केंद्राची वाढ होत मतदान केंद्रांची संख्या 3564 झाली आहे.
ग्रामीण भागात 2495 मतदान केंद्र
जिल्ह्यात शहरी भागात 1069 व ग्रामीण भागात 2495 मतदान केंद्र आहेत. मतदान केंद्राच्या ठिकाणे शहरी भागात 430, ग्रामीण भागात 1608 असे एकूण 2038 ठिकाणे आहेत. या व्यतिरिक्त 14 ठिकाणी सहाय्यक मतदान केंद्र असू शकतात कारण त्याठिकाणी मतदारांची संख्या 1500 च्या वर आहे. 1782 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगचे नियोजन करण्यात आले आहे. दुर्गम भागातील 16 मतदान केंद्रांवर मोबाईल नेटवर्क नाही.
तृतीयपंथी 135 मतदार
सध्याच्या जिल्ह्यात 9339 बॅलेट युनिट, 5450 कंट्रोल युनिट आणि 5733 व्हीव्हीपीएटी मशिन उपलब्ध आहेत.जिल्ह्याची लोकसंख्या 47,40,882 इतकी आहे. यात 34,91,098 मतदार संख्या आहे. मतदारांमध्ये 18,12,007 पुरूष तर 16,78,956 महिला मतदार आहेत. तृतीयपंथी 135 मतदार आहेत. शारीरिकदृष्ट्या दिव्यांग 19211 मतदार आहेत. 80 वर्षांवरील वयोमान असलेले 1,03,129 मतदार आहेत.
पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करू इच्छिणार्या गैरहजर मतदाराने सर्व तपशील भरून फॉर्म 12 डी द्वारे संबंधित मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी (ठज) कडे अर्ज करावा लागेल. पोस्टल बॅलेट सुविधेची मागणी करणारे असे अर्ज निवडणुकीच्या घोषणेच्या तारखेपासून संबंधित निवडणुकीच्या अधिसूचनेच्या तारखेपासून पाच दिवसांच्या कालावधीत आरओकडे पोहोचले पाहिजेत.असे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी केले आहे.
दोन मतदान अधिकार्यांचा समावेश असलेले मतदान पथक, एक व्हिडिओग्राफर आणि एक सुरक्षा व्यक्ती, मतदाराच्या घरी भेट देतात आणि मतदानाची संपूर्ण गुप्तता राखून मतदाराला पोस्टल बॅलेटवर मतदान करण्यास सांगतात. असे मतदार घरबसल्या मतदान करू शकतात, असे चिंचकर यांनी सांगितले.
जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत, पुरुषांपेक्षा 72 टक्क्यांहून अधिक महिलांनी नोंदणी केली आहे. लिंग गुणोत्तर दर 1000 पुरुषांमागे 927 महिला असे आहे. यात सुधारणा झाली आहे.
27 ऑक्टोबर 2023 ते 17 जानेवारी 2024 या कालावधीत 18-19 वयोगटातील मतदारांची संख्या 16229 वरून 38296 झाली आहे.
2022 पासून जिल्ह्यात एकूण 63711 मतदारांची वाढ झाली आहे. 243015 मतदारांची नावे हटवण्यात आली आहेत, तर 3,06,726 मतदारांचा मतदार यादीत समावेश करण्यात आला आहे. 23 जानेवारी 2024 रोजी मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.
नवीन निवडणूक फोटो ओळखपत्र 2,91,171 छापण्यात आले आहेत. टपाल विभागाकडून 2,36,011 निवडणूक छायाचित्र ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. 55,160 कार्डचे लवकरच वितरण केले जाणार आहे. असे श्री.चिंचकर यांनी सांगितले.
राज्य निवडणूक आयोग व राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने राज्यातील आगामी निवडणुकीच्या दृष्टीने तयारी व मतदार जागृती कार्यक्रमाचा दर आठवड्याला आढावा घेतला जात आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील तयारीबाबत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी समाधान व्यक्त केले आहे.


