जळगावातील तरुणाचा दुभाजकावर दुचाकी आदळल्याने मृत्यू
A young man in Jalgaon died after his bike hit a divider जळगाव : दुभाजकावर दुचाकी आदळल्याने जळगावातील गणेश प्रकाश पाटील (36, रा.आशाबाबा नगर) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवार, 23 जानेवारी रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास शिवकॉलनी उड्डाणपुलावर घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
दुचाकी दुभाजकावर आदळली अन गाठले मृत्यूने
जळगाव शहरातील आशाबाबा नगरात गणेश पाटील हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होते. त्यांच्याकडे आयशर ही मालवाहू वाहन आहे व हे वाहन चालवून आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. मंगळवार, 23 जानेवारी रोजी सायंकाळी त्यांनी कर्नाटक जाण्यासाठी कंपनीतून मालाची गाडी भरली आणि ते जेवणासाठी घरी आले. जेवण आटोपून रात्री 10 वाजेच्या सुमारास ते (एमएच 19 बीएन 8390) क्रमांकाच्या दुचाकीने गाडी लावलेल्या ठिकाणी जाण्यासाठी निघाले. शिवकॉलनी जवळील रेल्वे उड्डाणपुलावरुन जात असतांना त्यांची दुचाकी दुभाजकावर आदळली. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्यांचा जागीच मृत्यू झाला.


परीसरातील नागरिकांनी गणेश यांना तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणुका भंगाळे यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार जितेंद्र तावडे करीत आहे.
