मधमाश्यांच्या हल्ल्यानंतर ट्रॅक्टर तापी नदीत कोसळल्याने नांद्रा गावातील चालकाचा मृत्यू
The driver of Nandra village died after the tractor fell into the Tapi river after being attacked by bees जळगाव : नातेवाईकांच्या दहाव्याच्या कार्यक्रमासाठी लाकडे घेवून जात असतांना अचानक मधमाश्यांनी हल्ला केल्याने ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर तापी नदीत कोसळल्याने नांद्रा गावातील चालकाचा मृत्यू झाला. ही घटना नांद्रा येथे गुरूवार, 8 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. वासुदेव गोपीचंद सपकाळे (45, रा. नांद्रा, ता.जि.जळगाव) असे मयत ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे.
नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर कोसळले नदीत
जळगाव तालुक्यातील नांद्रा येथे वासूदेव गोपीचंद सपकाळे हे आपल्या पत्नी, दोन मुलं आणि मुलीसह वास्तव्याला होते. नांद्रा गावात त्यांच्या मामी यांचे निधन झाल्याने व दहाव्याचा कार्यक्रम असल्याने वासूदेव सपकाळे हे गुरूवार, 8 फेब्रुवारी रोजी दुपारी लाकडे घेण्यासाठी ट्रॅक्टरवर एकटेच गेले होते. लाकडे भरून नांद्रागावाकडे तापी नदीच्या रोडने येत असतांना दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अचानक त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला. यामुळे त्यांचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले व ट्रॅक्टर थेट तापी नदीत कोसळले. या अपघातात वासूदेव सपकाळे हे देखील पाण्यात पडले आणि त्यांच्या डोक्यावर ट्रॅक्टरचे स्टेअरींग पडल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.


जागीच झाला चालकाचा मृत्यू
अवघातानंतर काही अंतरावर गावातील अजय दिलीप सोनवणे हा तरूण नदीच्या काठावरील विहिरीजवळ काम करत असतांना त्यांच्या लक्षात आले. गावातील ग्रामस्थ व तरुणांनी धाव घेत वासूदेव सपकाळे यांचा मृतदेह बाहेर काढला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.
