भुसावळात दोघा दुचाकीस्वारांना चिरडणार्या ट्रक चालकाला नशिराबादनजीक पकडले
खडका चौफुलीवर भीषण अपघात : अपघातानंतर ट्रकने तब्बल 14 किलोमीटर फरफटत नेली दुचाकी : पोलिस उपअधीक्षकांच्या सतर्कतेमुळे चालकाला अटक
Truck driver who crushed two bikers in Bhusawal nabbed near Nasirabad भुसावळ : भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्यानंतर झालेल्या भीषण अपघातात जामनेर तालुक्यातील दोघे ठार झाले. हा अपघात गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास खडका चौफुलीनजीक घडला. अपघातानंतर ट्रकमध्ये दुचाकी अडकल्यानंतर चालकाने मारहाण होण्याची भीतीने तब्बल 14 किलोमीटरपर्यंत दुचाकी फरफटत नेली मात्र पोलिसांनी नाकाबंदी लावल्यानंतर नशिराबाद टोल नाक्यानजीक ट्रक चालकाला अटक करण्यात आली तर अपघाताला कारणीभूत असलेला ट्रक जप्त करण्यात आला. या अपघातात जितू राठोड व प्रकाश उखा तंवर (दोन्ही रा.माधव तांडा, ता.जामनेर) यांचा जागीच मृत्यू ओढवला.
भीषण अपघातात दोघे जागीच ठार
जितू राठोड व प्रकाश तंवर हे दोघे नातेवाईक प्लॅटीना दुचाकीवरून दीपनगरकडून जळगावच्या दिशेने जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव दहा चाकी ट्रक (आर.जे.11 जी.ए.9903) ने दुचाकीला जबर धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की दोघांचा डोक्याला जबर फटका बसल्यानंतर त्यांचा मेंदू बाहेर येवून दोघे जागीच गतप्राण झाले तर ट्रकच्या पुढील भागात दुचाकी अडकली. मारहाणीच्या भीतीने ट्रक चालकाने सुसाट वेगाने ट्रक नशिराबादच्या दिशेने नेला. पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी तातडीने नाकाबंदीचे आदेश दिल्यानंतर नशिराबाद टोल नाक्याजवळ पोलिस उपनिरीक्षक सुनील चौधरी व पथकाने ट्रक चालक श्याम बाबू (55, आग्रा, उत्तरप्रदेश) यास अटक केली.


मोबाईलवरून पटली मृतांची ओळख
पअपघातात मयत झालेल्यांपैकी एकाचा मोबाईलवर येत असलेल्या फोननंतर पोलिसांनी संबंधित कॉलला प्रतिसाद दिल्यानंतर मयतांची ओळख पटली. सायंकाळी उशिरा दोघांचे मृतदेह भुसावळातील ट्रामा केअर सेंटरमध्ये शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आले.
क्रेन लावून काढली दुचाकी
नशिराबाद टोल नाक्याजवळ ट्रक चालकाला ताब्यात घेतल्यानंतर पथकाने तातडीने क्रेन बोलावली व ट्रकच्या पुढील भागात अडकललेी दुचाकी मोठ्या प्रयत्नांनी बाहेर काढण्यात आली. यावेळी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक मंगेश चव्हाण व सहकार्यांनी ट्रकसह चालकाला ताब्यात घेत रात्री बाजारपेठ पोलिस ठाण्यात आणले. रात्री उशिरा ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
