जळगावातील दीड कोटींच्या दरोड्याची उकल ! : 48 लाखांच्या रोकडसह दोघे एलसीबीच्या ताब्यात


The solution to the robbery of one and a half crores in Jalgaon! : Two in custody of LCB with Rs 48 lakh cash जळगाव : धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील जिनिंग व्यापार्‍याची कार अडवून एका कारमधून आलेल्या तीन दरोडेखोरांनी सुमारे दिड कोटी रुपयांची रोकड लंपास केली होती. ही घटना शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली होती. जळगाव गुन्हे शाखेने दरोड्याची उकल केली असून दोघा आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी सायंकाळी पत्रकार परीषदेत दिली. अनिल उर्फ बंडू भानुदास कोळी (32) आणि दर्शन भगवान सोनवणे (29, दोन्ही रा. विदगाव, ता.जळगाव) अशी अटकेतील संशयित आरोपींची नावे आहेत. दरोड्यातील चौघे पसार असून त्यांचा कसून शोध सुरू आहे. दरम्यान, अटकेतील संशयितांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्यांच्याकडून गुन्ह्यातील वाहनांसह चार वाहने जप्त करण्यात आली तर 48 लाखांची रोकडही जप्त करण्यात आली.

पत्रकार परीषदेत दिली माहिती
पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रेरणा हॉलमध्ये सोमवारी आयोजित पत्रकार परीषदेला पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजनपाटील उपस्थित होते.

सिनेस्टाईल दरोड्याने खळबळ
धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील दुर्गेश इम्पेक्स जिनींगमधून शेतकर्‍यांना कापसाचे पेमेंट द्यावयाचे असल्याने जळगावच्या अ‍ॅक्सीस बँकेतून एक कोटी 60 लाख रुपये घेवून तीन कर्मचारी क्रेटा कारने जळगावहून धरणगावी जात असताना शनिवारी दुपारी 1.40 वाजेच्या सुमारास मुसळी फाट्याजवळ त्यांच्या कारला समोरुन येणार्‍या स्कॉर्पिटो कारने धडक दिली. अपघातानंतर लागलीच चौघांनी चालकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकली आणि लोखंडी रॉडने मारहाण करीत त्यांच्याकडील एक कोटी 60 लाखांची रोकड घेवून चोरटे तेथून अन्य चोरी केलेल्या कारने पसार झाले. भरदिवसा जिनिंगची रोकड लुटल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हे शाखेकडून दरोड्याची उकल
गुप्त माहिती आणि तांत्रिक माहितीच्या आधारे अनिल उर्फ बंडा भानुदास कोळी (32, रा.विदगाव) याचे नाव निष्पन्न केल्यानंतर त्याची कुंडली काढली. अनिल हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी देखील पाच गुन्हे दाखल असल्याने पथकाने त्याचा शोध घेत मुसक्या आवळल्या. चौकशी केली असता अनिल उर्फ बंडा कोळी याने आपल्या साथीदारांसोबत महिनाभर जिनिंगमधील कर्मचारी व मालकांच्या हालचालींची रेकी केली. यामध्ये ते कुठल्या दिवशी बँकेत येतात, कधी आणि किती कॅश कोणत्या रस्त्याने घेवून जातात, ही संपूर्ण माहिती गोळा केल्यानंतर अनिल याने दरोड्याचा प्लॅन रचला. एका गुन्ह्यात जिल्हा कारागृहात असतांना त्याची ओळख घरफोडीमधील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारासोबत झाली. बंडा हा जामीनावर बाहेर आल्यानंतर त्याने उल्हासनगर येथील दरोडा टोळीशी संपर्क प्लॅन अंमलात आणला. दोघांना सोमवारी धरणगाव येथे न्या.सूर्यवंशी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना पुढील तपासाकामी गुरुवार, 22 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अमोल मोरे, उपनिरीक्षक गणेश वाघमारे, कर्मचारी विजयसिंग पाटील, विजय पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, महेश महाजन, अकरम शेख, राहूल पाटील, भगवान पाटील, नंदलाल पाटील, सचिन महाजन, रफिक शेख, लक्ष्मण पाटील, सुधाकर अंभोरे, जयंत चौधरी, संदिप सावळे, किरण चौधरी, ईश्वर पाटील, लोकेश माळी, अनिल जाधव, हेमंत पाटील, राहुल बैसाणे, दर्शन ढाकणे, महेश सोमवंशी, अभिलाषा मनोरे, रजनी माळी, वैशाली सोनवणे, रवी नरवाडे, संजय हिवरकर, राजेश मेंढे, कमलाकर बागुल, संदिप पाटील, गोरख बागुल, प्रवी मांडोळे, अनिल देशमुख आदींच्या पथकाने आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

 


कॉपी करू नका.