भुसावळातील झेडआरटीआयच्या प्राचार्यासह कार्यालय अधीक्षकाला दोन दिवसांची सीबीआय कोठडी

नऊ हजारांचे लाच प्रकरण : आरोपींच्या घरासह कार्यालयात सीबीआयकडून झाडाझडती


Two-day CBI custody of office superintendent along with principal of ZRTI in Bhusawal भुसावळ : रेल्वे प्रशिक्षण संस्थेत (झेडआरटीआय) लावलेल्या भाडे तत्वावरील वाहनाच्या लॉग बुकवर जुन्या तारखेत स्वाक्षरी करण्यासाठी तडजोडीअंती नऊ हजारांची लाच स्वीकारताना भुसावळातील प्रशिक्षण संस्थेचे कार्यालय अधीक्षक (टेंडर)योगेश देशमुख व प्राचार्य सुरेश चंद्र जैन यांना अटक करण्यात आली होती. पुण्यातील सीबीआयच्या अधिकार्‍यांनी बुधवारी दुपारी 12 वाजता प्राचार्यांच्या दालनातच हा सापळा यशस्वी केला होता. अटकेतील संशयिताना गुरुवारी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता दोघांना दोन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली.

असे आहे लाच प्रकरण
भुसावळातील रहिवासी असलेल्या एका तक्रारदार तरुणाने रेल्वे प्रशिक्षण संस्थेत (झेडआरटीआय) भाडे तत्वावर वाहन लावले आहे. त्यातील एका वाहनाला 18 मे 2023 ते 17 मे 2025 कालावधीपर्यंत प्रशिक्षण संस्थेत लावण्यास प्राचार्यांनी मंजुरी दिली मात्र दरमहा वाहन फिरल्यानंतर त्यापोटी मिळणार्‍या बिलासाठी दरमहा प्राचार्यांकडून लाचेची मागणी केली जात होती. तक्रारदाराने प्राचार्यांना लाच देण्यास नकार दिल्यानंतर 25 फेब्रुवारी 2024 रोजी तक्रारदार वाहन चालकाचा कंत्राट प्राचार्यांनी समाप्त केला मात्र 18 जानेवारी 2024 ते 25 फेब्रुवारी 2024 दरम्यानच्या काळातील बिल प्रलंबित राहिल्याने हे बिल काढून देण्यासाठी व लॉग बुकवर स्वाक्षरी करण्यासाठी प्राचार्यांनी कार्यालय अधीक्षकांकरवी सुरूवातीला पाच हजारांची व नंतर दहा हजारांची लाच मागितली व लाच रकमेत तडजोड होवून नऊ हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. बुधवारी दुपारी 12 वाजता तक्रारदाराने कार्यालय अधीक्षक देशमुख यास लाच रक्कम दिल्यानंतर त्याने ही रक्कम प्राचार्यांच्या दालनात येत प्राचार्यांना देत सीबीआयच्या पथकाने दोघांना अटक केली. पुण्यातील सीबीआय निरीक्षक महेश चव्हाण व 17 अधिकार्‍यांनी हा सापळा यशस्वी केला.

घरासह कार्यालयाची झाडाझडती
प्राचार्यासह कार्यालय अधीक्षकांना अटक केल्यानंतर प्राचार्यांच्या दालनातच दोघांना बसवून ठेवून सीबीआयने झाडाझडती घेतली. यावेळी कार्यालयासह दोघा आरोपींच्या घराची पथकाने झाडाझडती घेतली. संशयिताना भुसावळ तालुक्याच्या कारागृहात बुधवारी रात्री ठेवल्यानंतर गुरुवारी त्यांना अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली. सीबीआयतर्फे आलेल्या वकीलांनी यावेळी बाजू मांडली. आरोपींनी यापूर्वी आणखी कुणाकडून अशा पद्धत्तीने लाच स्वीकारली आहे याचा तपास करण्यासाठी सीबीआय कोठडीची मागणी करण्यात आली.


कॉपी करू नका.