धावत्या रेल्वेखाली आल्याने भादलीतील तरुणाचा मृत्यू
A young man from Bhadli died after falling under a running train नशिराबाद : धावत्या रेल्वेखाली आल्याने भादली गावातील 27 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. नशिराबाद ते तरसोद फाट्याजवळ गुरूवार, 21 मार्च रोजी सकाळी 5.30 वाजेच्या सुमारास उघडकीला आला. देवेंंद्र रामकृष्ण कोल्हे (27, रा.भादली, ता.जळगाव) असे मयताचे नाव आहे.
रेल्वेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू
जळगाव तालुक्यातील भादली येथे देवेंद्र कोल्हे हा तरुण आई-वडील, पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्यास होता व शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. बुधवार, 20 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता गावात जावून येतो, असे सांगून देवेंद्र हा घरातून निघून गेला होता. धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने गुरूवार, 21 मार्च रोजी सकाळी 5.30 वाजेच्या सुमारास नशिराबाद ते तरसोद रेल्वे फाट्यादरम्यानच्या रेल्वे रूळावर त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. मयत तरुणाच्या पश्चात आई, वडील, पत्नी कोमल आणि दोन मुलं असा परिवार आहे.

