मुक्ताईनगरात सात लाखांचा गुटखा जप्त : दोन आरोपींना अटक


Gutkha worth seven lakh seized in Muktainagar : Two accused arrested मुक्ताईनगर  : मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात विक्रीसाठी येत असलेल्या अवैध गुटख्यावर मुक्ताईनगर पोलिसांनी कारवाई करीत दोघांना अटक केली तर सुमारे सात लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. या कारवाईने गुटखा तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. अक्षय गजानन गुळवे (25, बोराखेडी, ता.मोताळा) व सुदाम रामराव व्यवहारे (40, रा.फर्दापूर, ता.मोताळा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

गोपनीय माहितीवरून कारवाई
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुक्ताईनगर पोलिसांनी रविवारी पहाटे पोहाचौका हॉटेल समोर नाकाबंदी केल्यानंतर चारचाकी इको (एम.एच.30 बी.बी.7916) वाहनाची तपासणी केली असता त्यात महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला मोठ्या प्रमाणावर गुटख्याचा साठा आढळला. केशरयुक्त विमल पानमसाला, बिग तंबाखू, किंग तंबाखू, करमचंद प्रीमीयम पानमसाला तसेच पाच लाख 50 हजार रुपये किंमतीची इको व्हॅन मिळून 12 लाख 82 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस अंमलदार प्रवीण जाधव यांच्या फिर्यादीवरुन संशयीत अक्षय गजानन गुळवे (25, बोराखेडी, ता.मोताळा) व सुदाम रामराव व्यवहारे (40, रा.फर्दापूर, ता.मोताळा) यांच्याविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीतांना रविवारी न्यायालयात हजर केले असता एका दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस निरीक्षक नागेश मोहिते व सहकार्‍यांनी ही कारवाई केल्याने गुटखा तस्करांच्या गोटात खळबळ उडाली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !